फेडेरेशन कपमध्ये खेळण्यासाठी उत्सुक: रिशांक देवाडिगा, कर्णधार महाराष्ट्र

मुंबई । राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला तब्बल ११ वर्षांनी विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा स्टार कबड्डीपटू आणि महाराष्ट्र संघाचा कर्णधार रिशांक देवाडिगा मुंबईमध्ये होणाऱ्या फेडेरेशन कपमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे. एवढी मोठी स्पर्धा मुंबईत होत असल्यामुळे आनंदी असल्याचेही त्याने आज महा स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले.

“मी २०११ साली मुंबईमध्ये राष्ट्रीय स्पर्धेत खेळलो होतो. त्यानंतर कोणतीही मोठी स्पर्धा मुंबई शहरात झाली नाही. त्यामुळे फेडरेशन कपसारखी मोठी स्पर्धा येथे होत असल्याने आनंद होत आहे. त्यातही ही स्पर्धा माझी घरची असोशिएशन अर्थात मुंबई उपनगर कबड्डी आयोजित करत आहे याचा जास्त आनंद आहे. ” असे रिशांक म्हणाला.

“मुंबईमधील कबड्डीप्रेमींसाठी ही मोठी आनंदाची बाब आहे. यात त्यांना देशातील मोठे खेळाडू या स्पर्धेत खेळताना पाहायची मोठी संधी आहे. ” असेही तो पुढे म्हणाला.

स्पर्धा फेब्रुवारीमध्ये असल्याचे तुझ्या या काळात योजना काय आहेत, यावर बोलताना तो म्हणाला, ” मी सध्या माझ्या विभागाची स्पर्धा खेळायला केरळ येथे जात आहे. १८ ते २१ जानेवारी या काळात ही स्पर्धा होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या संघाचा १ फेब्रुवारीपासून कॅम्प आहे. मी त्यात भाग घेणार आहे. मला याबद्दल अजून अधिकृत काही समजले नाही परंतु ह्या काळात कॅम्प होईल. “

फेडरेशन कपचे हे तिसरे वर्ष असून ही स्पर्धा मुंबई उपनगर कबड्डी असोशिएशन आयोजित करत असून ९ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०१८ या काळात ही स्पर्धा होणार आहे. एसआरपीएफ क्रीडांगण, जयकोच, पश्चिम द्रुतगती महामार्ग जोगेश्वरी येथे ही स्पर्धा होणार आहे.

उपलब्ध माहितीप्रमाणे या स्पर्धेचे प्रथम १९८२ मध्ये प्रथम आयोजन झाले होते तर २०१७मध्ये इंदोर शहरात ही स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत खेळलेले महिला आणि पुरुष गटाचे संघ भाग घेणार आहे.

दोन्ही गटाचे मिळून एकूण १८ संघ या स्पर्धेत खेळताना दिसतील. त्यामुळे एकप्रकारे कबड्डीमधील भारतातील दिग्गज संघ या स्पर्धेत भाग घेताना दिसतील.