इराणी ट्राॅफी: पहिला दिवस विदर्भाचा, शेष भारताविरूद्ध २ बाद २८९ धावांंचा डोंगर

नागपूर | येथील विदर्भ क्रिकेट असोशियशनच्या मैदानावर आज विदर्भाने शेष भारताविरूद्ध २ बाद २८९ धावांचा डोंगर उभा केला आहे. यात वसिम जाफरच्या शतकी खेळीचा समावेश आहे. 

आज विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत विदर्भाने शेष भारताविरूद्ध १०१ धावांची सलामी दिली. यात संजय रामास्वामीने १११ चेंडूत ५३ धावा केल्या. 

त्यानंतर मैदानात आलेल्या वसिम जाफरने कर्णधार फैज फजलसह सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेतली. १९० चेंडूत ८९ धावा करणाऱ्या फैज फजलला शतकी खेळी करण्यात अपयश आले. मात्र जाफरने ही संधी दवडली नाही. 

त्याने  दिवस अखेर १६६ चेंडूत ११३ धावांची नाबाद खेळी केली आहे. त्याला गणेश सतीश ७४ चेंडूत २९ धावांची चांगली खेळी करत उत्तम साथ देत आहे. 

 

वसिम जाफरची ही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ५३वी शतकी खेळी ठरली आहे. त्याने आजपर्यंत १२ इराणी ट्राॅफी सामन्यात ५३.०५च्या सरासरीने ३ शतकांसह ११०९ धावा केल्या आहेत.  

तो  इराणी ट्राॅफी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तसेच इराणी ट्राॅफीमध्ये सलग ६ डावात ५० पेक्षा अधिक धावा करणारा तो आज केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे.