विदर्भाने पहिल्यांदाच कोरले रणजी ट्रॉफीवर आपले नाव

इंदोर। आज विदर्भाने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दिल्लीवर मात करत इतिहास रचला आहे. विदर्भाने दिल्लीवर ९ विकेट्सने विजय मिळवला आणि पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.

दिल्लीने विदर्भाला दुसऱ्या डावात फक्त २९ धावांचे आव्हान दिले होते जे विदर्भाने एका बळीच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. विदर्भाचा अनुभवी फलंदाज वासिम जाफरने एका षटकात ४ चौकार खेचत विदर्भाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने नाबाद १७ धावा केल्या. त्याच्याबरोबर संजय रामास्वामी(९*) नाबाद राहिला तर फेज फेझल २ धावांवर बाद झाला.

तत्पूर्वी विदर्भाने दिल्लीला दुसऱ्या डावात २८० धावांवर सर्वबाद केले. दिल्लीकडून ध्रुव शोरे(६२) आणि नितीश राणा(६४) यांनी चांगली कामगिरी केली या दोघांनीही अर्धशतके झळकावली होती. तसेच दोघांनी मिळून तिसऱ्या विकेट साठी ११४ धावांची भागीदारीही रचली होती. परंतु हे दोघे बाद झाल्यावर बाकी फलंदाजांनी हवी तशी कामगिरी केली नाही.

उपांत्य सामन्याप्रमाणेच या वेळीही रजनीश गुरबानीने विदर्भाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. त्याने पहिल्या डावात घेतलेल्या सहा बळींच्या जोरावर विदर्भाने दिल्लीचा पहिला डाव २९५ धावांवरच आटोपण्यात यश मिळवले होते. गुरबानीने या सामन्यात एकूण आठ बळी घेतले आहेत.

विदर्भाने या सामन्यात उत्तम कामगिरीचे प्रदर्शन करताना पहिल्या डावात २५२ धावांची आघाडी मिळवली होती. त्यांनी पहिल्या डावात ५४७ धावांचा डोंगर उभा केला होता. विदर्भाकडून पहिल्या डावात अक्षय वाडकरने १३३ धावांची शतकी खेळी केली होती. त्याच्या बरोबरच फेज फेझल(६७), वासिम जाफर(७८), आदित्य सरवटे(७९) आणि सिद्धेश नेरळ(७४) यांनी देखील अर्धशतकी खेळी केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक:
दिल्ली पहिला डाव: सर्वबाद २९५ धावा
विदर्भ पहिला डाव: सर्वबाद ५४७ धावा
दिल्ली दुसरा डाव: सर्वबाद २८० धावा
विदर्भ दुसरा डाव: १ बाद ३२ धावा

सामनावीर: रजनीश गुरबानी