केएल राहुलचे मैदानातील ते कृत्य पाहून अंपायरलाही करावे लागले कौतुक, पहा व्हिडिओ

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याचा आज(5 जानेवारी) तिसरा दिवस आहे. आज ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रापर्यंत 1 बाद 122 धावा केल्या आहेत.

आज खेळ सुरु झाल्यानंतर काहीवेळातच भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीने त्याचे सर्वांनीच कौतुक केले आहे.

झाले असे की 15 षटकात रविंद्र जडेजा गोलंदाजी करत असताना या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मार्कस हॅरिसने हवेत फटका मारला. त्यावेळी तो चेंडू मिड ऑनच्या दिशेला गेला. तिथे उभ्या असणाऱ्या केएल राहुलने फुल लेंथ डाइव्ह करत झेल घेतला.

त्यामुळे प्रत्येकाला वाटले की मार्कस बाद झाला, पण राहुलने त्याचवेळी सांगितले की चेंडू आधी जमिनीला लागला आहे आणि मग त्याच्या हातात आला आहे. राहुलची ही खिलाडूवृत्ती पाहून मैदानावरील पंच इयान गुल्ड यांनीही टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. तसेच ऑस्ट्रेलियाच्या समालोचकांनीही राहुलचे कौतुक केले. त्यावेळी हॅरिस 24 धावांवर होता.

त्यानंतर हॅरिसने या जीवदानाचा फायदा घेत त्याचे कसोटीमधील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. तो पहिले सत्र संपले तेव्हा 77 धावांवर नाबाद होता.

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज उस्मान ख्वाजाला कुलदीप यादवने 27 धावांवर असताना बाद केले. पण त्यानंतर मार्नस लॅब्सचेंज आणि हॅरिसने ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला.

या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला आहे. भारताकडून चेतेश्वर पुजारा 193 आणि रिषभ पंतने नाबाद 159 धावांची शतकी, तर रविंद्र जडेजा 81 आणि मयंक अगरवालने 77 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: जेव्हा ऑस्ट्रेलियन कर्णधार पत्रकार परिषदेत बोलतो पत्रकाराच्याच फोनवर…

टीम इंडियाचे टेंशन वाढले, वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात झाले या खेळाडूंचे पुनरागमन

Video: ‘तूला कंटाळा येत नाही का?’लायनचा पुजाराला प्रश्न