ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीने दिले पारंपरिक व्यायामाचे धडे…

साईनाथ मंडळ ट्रस्ट : हनुमान जयंतीनिमित्त पेशवेकालीन गराडे तालमीत उपक्रम

पुणे : मुद्गल फिरविणे…रस्सीच्या सहाय्याने वर चढणे…दगडी चाक घेऊन चालणे…जोर-बैठका मारणे…अशा व्यायामप्रकारांचे महत्त्व चिमुकल्यांना सांगत आणि नवोदित मल्लांना कुस्तीमधील डावांचे प्रात्यक्षिक दाखवित सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकाविणाºया विजय चौधरी यांनी लाल मातीतील पारंपरिक व्यायामाचे धडे दिले. बजरंग बली की जय… असे म्हणणा-या चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत जमलेल्या सर्वच बलोपासकांनी विजय चौधरी यांच्या महाराष्ट्र केसरी किताब सलग तीन वेळा जिंकण्यामागचे रहस्य प्रत्यक्ष आखाडयामध्ये जाणून घेतले.

 

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टच्यावतीने हनुमान जयंतीचे औचित्य साधून १६५ वर्षे जुन्या पेशवेकालीन गराडे तालमीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष पीयुष शहा, नरेंद्र व्यास, अमर हिरेशिखर, गणेश चव्हाण, गराडे तालीमचे वस्ताद दिलीप कांबळे, किरण जावळकर, संकेत निंबाळकर, गिरीश मिस्त्री, बालाजी गोडगिरी, महेश सहाणे, अक्षय भोई, राजीव पाटसकर, डॉ.विजय पोटफोडे आदी उपस्थित होते. हनुमानाच्या वेषातील चिमुकल्यासोबत विजय चौधरी यांच्या हस्ते आखाडयाची पूजा करण्यात आली.

 

विजय चौधरी म्हणाले, पूर्वी पुण्यात २०० ते ३०० च्या घरात तालमी होत्या, परंतु आता अगदी बोटावर मोजण्या इतक्या तालमी शिल्लक राहिल्या आहेत. मुलांना तालमीत जाऊन व्यायाम करण्याची सवय लागावी, यासाठी पालकांनी पुढाकार घ्यायला हवा. कुस्ती ही महाराष्ट्राची ओळख आहे. हा अवघड खेळ असला तरी नियमीत व्यायाम आणि योग्य आहाराने आपण त्यामध्ये प्राविण्य मिळवू शकतो, असेही त्यांनी सांगितले. तसेच दररोजचा आहार, व्यायाम आणि पथ्य याविषयी देखील त्यांनी मार्गदर्शन केले.

 

पीयुष शहा म्हणाले, तालमींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तालमीचे ते दिवस परत यावेत आणि मोबाईल गेम्सच्या आहारी गेलेल्या मुलांना पुन्हा तालमीत जाऊन व्यायाम करावा, यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले. मुद््गल फिरविण्यासोबतच रस्सीवर प्रत्यक्ष चढण्याचा आनंद यावेळी चिमुकल्यांनी घेतला.