ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आज ट्विटरकट्टा वर…

३ वेळचा महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आज ‘ट्विटरकट्टा’ या मराठी ट्विटरकरांनी सुरु केलेल्या कार्यक्रमात येणार आहे. हा ऑनलाईन प्रश्न-उत्तरांचा तास आज अर्थात ७ एप्रिल रोजी ९ ते १० या वेळात होणार आहे. विजय या कार्यक्रमात त्याच्या चाहत्यांच्या विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देणार आहे.

 

विजय ट्विटरकट्ट्यावर येणार याची अधिकृत घोषणा ट्विटरवर मराठीमधील प्रसिद्ध अकाउंट @TweetKatta ने काही दिवसांपूर्वी केली. विजयचे चाहते त्याची बऱ्याच दिवसांपासून ट्विटरकट्टावर वाट पहात होते. परंतु विजयच स्वतःचं ट्विटरवर नसल्याने हा योग जुळून येत नव्हता. परंतु गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विजयचे @WrestlerVijay या नावाने ट्विटरवर आगमन झाले आणि काही दिवसातच त्याचा यासाठी होकारही आला. हे ट्विटरकट्टाचे १६वे पर्व असून यावेळी आयोजक म्हणून महा स्पोर्ट्सही पुढे आले आहे.

 

काय आहे ट्विटरकट्टा:

#ट्विटरकट्टा हा एक ट्विटरवरील मराठी चाहत्यांसाठी ऑनलाईन प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज येतात आणि आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात. आजपर्यंत याचे १५ भाग झाले असून प्रत्येक वेळी अंदाजे ५०० ते ६०० प्रश्न चाहत्यांकडून त्या दिवशीच्या पाहूण्याला विचारले जातात. ही एक अतिशय नाविन्यपूर्ण कल्पना असून ती मराठीमध्ये राबविली जाते हे विशेष. प्रत्येक वेळी आपल्या आवडत्या कलाकार, खेळाडू, दिग्गजाला भेटणे त्याच्या चाहत्याला जमेलच असे नाही. परंतु तेच चाहते जर ट्विटरवर असेल तर ते आपल्या ह्या आवडत्या व्यक्तीला प्रश्न विचारू शकतात. ट्विटरवर मराठीसाठी काम करणारी खास अकाउंट आहेत ज्यात मराठी ब्रेन आणि मराठी विचारधन ही अग्रणी आहेत. त्यांनीच ही कल्पना सुरु केली. १६व्या पर्वात महा स्पोर्ट्सपण या उपक्रमात जोडले गेले आहे आणि यापुढे महा स्पोर्ट्स खेळाडू असलेल्या सर्व #ट्विटरकट्टा मध्ये भाग घेणार आहे.

 

या आधीचे ट्विटरकट्टा मधील पाहुणे:
याआधी ट्विटरकट्टा मध्ये अनेक दिग्गज पाहुणे येऊन गेलेले आहेत. ज्यात अगदी दिग्गज पत्रकारांपासून ते मराठी मधील कलाकार मंडळी यांचा समावेश आहे. आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार म्हात्रे,लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी, मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार स्वप्नील जोशी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता सुबोध भावे, एबीपी माझाच्या वृत्तनिवेदक ज्ञानदा कदम, अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेत्री श्रुती मराठे, आरजे शोनाली असे दिग्गज यापूर्वी या कार्यक्रमात आले आहेत.

 

हा ट्विटरकट्टा विशेष:
हा ट्विटरकट्टा विशेष असण्याची बरीच करणे आहेत. त्यातील मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील खेळाडू कट्ट्यावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यातही तो महाराष्ट्राची शान असणाऱ्या महाराष्ट्र केसरीचा तीन वेळचा विजेता आहे हे विशेष. दुसरं म्हणजे विजय चौधरीची लोकप्रियता ही अगदी ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत आहे. त्याचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही मोठीच संधी आहे.