विजय हजारे ट्राॅफी: विदर्भाचा महाराष्ट्रावर 3 विकेट्सने विजय

अलूर। आज (2 आॅक्टोबर) विदर्भ संघाने विजय हजारे ट्रॉफी 2018 च्या 9 व्या फेरीत महाराष्ट्रावर शेवटच्या षटकात 3 विकेट्सने विजय मिळवला आहे.

या सामन्यात महाराष्ट्राने विदर्भासमोर विजयासाठी 50 षटकात 206 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भ संघाची सुरुवाच अत्यंत खराब झाली होती. त्यांनी त्यांच्या पहिल्या चार विकेट 15 षटकातच 29 धावांवर गमावल्या होत्या.

मात्र त्यानंतर अक्षय वाडकरने विदर्भाचा डाव सांभाळला. त्याने रुषभ राठोडला(20) साथीला घेत सहाव्या विकेटसाठी 52 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. पण ही जोडी रुषभ धावबाद झाल्याने तुटली.

पण त्यानंतरही अक्षयला नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या दर्शन नालकांडेने आक्रमक खेळ करत चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून आठव्या विकेटसाठी 83 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली.

तसेच या दोघांनीही नाबाद अर्धशतकेही केली. अक्षयने विदर्भाचा डाव सावरताना 120 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार मारले.

तर दर्शनने आक्रमक फटकेबाजी करताना 30 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 53 धावा केल्या आणि विदर्भाला 49.2 षटकात विजय मिळवून दिला.

महाराष्ट्राकडून समाद फल्लाहने 2 तर अनुपम संकलेचा, अक्षय पालकर, सत्यजीत बचाव आणि शामशुझमा काझीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी सुरुवात चांगली केली. त्यांच्याकडून ऋतुराज गायकवाड आणि जय पांडेने 56 धावांची सलामी भागीदारी केली होती. पण या दोघांनीही खेळपट्टीवर स्थिर झाल्यावर आपल्या विकेट गमावल्या.

पण त्यानंतर नियमित कालांतराने महाराष्ट्राच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स गमावल्या. महाराष्ट्राकडून फक्त अंकित बावणेने अर्धशतक केले. त्याने 102 चेंडूत 62 धावांची खेळी करताना 3 चौकार आणि 1 षटकार मारला.

त्याच्या 62 धावा या महाराष्ट्राच्या आजच्या डावातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. महाराष्ट्राने 50 षटकात 8 बाद 205 धावा केल्या होत्या.

विदर्भाकडून दर्शन नालकांडे, आदित्य सरवटे आणि संजय रामास्वामी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर रजनीश गुरबानी आणि अक्षय वखारेने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

एशिया कपमध्ये खेळलेल्या २१ वर्षीय खेळाडूने पायलट बनण्यासाठी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

विराट कोहलीला अझरुद्दीनचा हा विक्रम मोडण्याची संधी

करुण नायरला संघात संधी न दिल्याने हरभजन सिंगची निवड समितीवर कठोर शब्दात टिका