१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वविजेत्या संघातील सर्वच स्टार आज फ्लॉप !

मुंबई । सध्या देशातंर्गत क्रिकेटमध्ये विजय हजारे ट्रॉफीचे सामने सुरु असून क आणि ड गटाचे सर्व सामने पार पडले आहेत तर अ आणि ब गटातील काही लढती बाकी आहेत. ह्या साखळी फेरीतील सर्व लढती १७ फेब्रुवारी रोजी संपणार असून त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहे.

या स्पर्धेत भारताला २०१८चा १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकून देणारे आणि अंतिम सामन्यात खेळलेले ६ खेळाडू खेळत आहे. त्यात मुंबईकर पृथ्वी शॉ, अनुकूल रॉय, अभिषेक शर्मा, शुभमन गिल, रियान पराग आणि कमलेश नागरकोट्टीचा समावेश आहे.

यातील एक पृथ्वी शॉ सोडला तर अन्य खेळाडूंची कामगिरी जेमतेम राहिली आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्या सुमार कामगिरीचा पंजाबला चांगलाच फटका बसला आहे. हा संघ अ गटात तिसऱ्या स्थानी असून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळण्याच्या आशा जवळपास मावळल्या आहेत.

मुंबईचा संघ विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला असून मुंबईने ६ पैकी ४ लढती जिंकल्या आहेत. पृथ्वी शॉला साखळी फेरीत ६ पैकी ४ लढती खेळायला मिळाल्या. त्यात त्याने २ अर्धशतकांसह १४५ धावा केल्या आहेत.

या स्पर्धेत अभिषेक शर्मा पंजाबकडून ६ पैकी ६ सामने खेळला असून त्यात त्याने २ विकेट्स आणि ९० धावा अशी कामगिरी केली आहे तर शुभमन गिलने ६ सामन्यात १७७ धावा केल्या आहेत. त्यात त्याने एक शतक (१२३ धावा) केले आहे.

रियाण परागने आसामकडून ५ पैकी ५ सामन्यात भाग घेतला असून आसाम पाचही सामने पराभूत झाला असून अ गटात तळाला आहे. रियाणने आसामकडून ५ सामन्यात ४ विकेट्स आणि १२१ धावा केल्या आहेत.

झारखंडकडून अनुकूल रॉयने ६ पैकी ४ सामन्यात भाग घेतला असून त्यात त्याने ४ विकेट्स आणि ५८ धावा केल्या आहेत. हा संघ ड गटात पाचव्या स्थानी असून उपांत्यपूर्व फेरीसाठी अपात्र ठरला आहे.

ज्या नावाची १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात मोठी चर्चा झाली त्या कमलेश नागरकोट्टीलाही देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप सोडता आली नाही. राजस्थानकडून ६ पैकी २ सामन्यात खेळताना त्याने ४ धावा करताना ० विकेट्स घेतल्या आहेत.