विराट कोहलीची रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी

कोलंबो । वनडे क्रिकेटमध्ये सार्वधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध पाचव्या वनडे सामन्यात शतक करून कारकिर्दीतील ३०वे शतक साजरे केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने ३७५ वनडे सामन्यात ३० शतके केली आहेत तर विराटला ही कामगिरी करण्यासाठी केवळ १९४ सामने लागले आहेत.

गेल्याच सामन्यात विराटने २९वे वनडे शतक करून सनथ जयसूर्याला मागे टाकत या यादीत तिसरा क्रमांक पटकावला होता. याबरोबर कोहलीने श्रीलंकेविरुद्ध ८ शतके करून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्याही विक्रमाची बरोबरी केली आहे.

याबरोबर विराटने एकाच वर्षात १००० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम ५व्यांदा केला आहे. अशी कामगिरी करणारा तो केवळ पाचवा खेळाडू आहे. अशी कामगिरी वनडे करणारा यावर्षीचा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

विराटने यावर्षी १८ सामन्यात ९०च्या सरासरीने १००० धावा केल्या आहेत. दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा फाफ डुप्लेसी असून त्याने १६ सामन्यांत ५८.१४च्या सरासरीने ८१४ धावा केल्या आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये सार्वधिक शतके करणारे खेळाडू
४९ सचिन तेंडुलकर (सामने- ४६३)
३० विराट कोहली (सामने- १९४*)
३० रिकी पॉन्टिंग (सामने- ३७५)
२८ सनाथ जयसूर्या (सामने- ४४५)
२५ हाशिम अमला (सामने- १५६*)
२५ कुमार संगकारा (सामने- ४०४)