विराट कोहली आणि अॅडलेड…हे नातं काही खास!

अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात अॅडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

हा सामना जिंकल्याबरोबरच भारतीय कर्णधार विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहे. यामध्ये विराट हा आॅस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तिन्ही देशात कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.

तसेच त्याने ऑस्ट्रेलियन भूमीत 1000 कसोटी धावा करण्याचा सर डॉन ब्रॅडमन यांचा 87 वर्षे जुना विक्रमही तोडला आहे.

विराटसाठी अॅडलेड ओव्हल हे मैदान नेहमीच विविध कारणांसाठी खास ठरले आहे. 

पहिले कसोटी शतक-

2011मध्ये विंडीज विरुद्ध कसोटीमध्ये पदार्पण करणाऱ्या विराटसाठी हे मैदान विशेष आहे. त्याने 2012मध्ये आॅस्ट्रेलिया दौऱ्यात याच मैदानात 116 धावा करत कसोटीमधील पहिले शतक झळकावले होते. हे शतक त्याने कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात पहिल्या डावात 54.46च्या स्ट्राईक रेटने केले होते.

कसोटी कर्णधार म्हणून पहिला सामना-

भारताच्या 2014 च्या आॅस्ट्रेलिया दौऱ्याआधी त्यावेळीचा भारताचा नियमित कर्णधार एमएस धोनी दुखापतग्रस्त होता. त्यामुळे त्याला या मालिकेतील अॅडलेड ओव्हल मैदानावर होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते. यामुळे भारताच्या संघाच्या  प्रभारी कर्णधाराची भुमिका विराटने बजावली होती. विराटचा हा कसोटीमध्ये कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता.

विशेष म्हणजे त्या सामन्यात विराटने दोन्ही डावात शतकी खेळी केल्या होत्या. पण हा सामना भारताला 48 धावांनी गमवावा लागला होता.

यासामन्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात धोनीने पुन्हा कर्णधारपदाची धूरा सांभाळली. पण त्यानंतर धोनीने कसोटी क्रिकेटमधूनच निवृत्ती घेतल्याने विराटला भारतीय कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार करण्यात आले. पण विराटची कसोटी कर्णधार म्हणून सुरुवात या मालिकेतील अॅडलेड कसोटीमधून झाली. त्यामुळे ती कसोटी त्याच्यासाठी खास असेल.

2015 विश्वचषकातील शतक-

आयसीसी 2015 विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलियाकडे होते. या स्पर्धेत अॅडलेड येथे भारताचा पहिलाच सामना पाकिस्तान विरुद्ध पार पडला. या सामन्यात विराटने 107 धावांची खेळी केली होती. हा सामना भारताने 76 धावांनी जिंकला होता. त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही मिळाला होता.

आंतरराष्ट्रीय टी20मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या-

आंतरराष्ट्रीय टी20 मधील विराटने त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या याच मैदानावर केली आहे. 2016मध्ये त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 55 चेंडूत नाबाद 90 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने 37 धावांनी जिंकला होता. या धावा विराटच्या आंतरराष्ट्रीय टी20 मधील सर्वोच्च वैयक्तिक धावा आहेत.

विराट – अनुष्काला लग्न करण्याचे आमंत्रण-

विराटचा या मैदानावरील इतिहास पाहता अॅडलेड ओव्हल मैदानाचे सीईओ अँड्रयू डॅनिअल यांनी विराट आणि त्याची पत्नी अनुष्का यांना त्यांचे लग्न या मैदानावर आयोजित करण्याचे सुचविले होते.

आॅस्ट्रेलियात कसोटी कर्णधार म्हणून पहिला विजय-

सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विराटच्या नेतृत्वाखाली हा सामना जिंकत एेतिहासिक विजय मिळवला आहे. या मालिकेला विजयी सुरूवात केल्याने भारतीय संघाचे ही मालिका जिंकण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे विराटचा हा आॅस्ट्रेलियातील पहिला कसोटी विजय आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

जे कोणत्याही आशियाई कर्णधाराला जमले नाही ते विराट कोहलीने करुन दाखवले!

अॅडलेड कसोटी जिंकत विराट कोहलीच्या टीम इंडियाने घडवला इतिहास

अॅडलेड कसोटीत यष्टीरक्षक रिषभ पंत चमकला, केले हे खास विक्रम