कोहली- बुमराह आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल !

दुबई । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे आयसीसी टी२व क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखून आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलँड यांच्यातील टी२० मालिकेनंतर आज आयसीसीने ही क्रमवारी घोषित केली.

न्यूझीलँड संघ जरी ही मालिका १-२ अशी पराभूत झाला असला तरी त्यांच्या गोलंदाजांना याचा चांगलाच फायदा झाला आहे. मालिकेत ५ विकेट घेणारा यश सोधी प्रथमच आयसीसी टी२० क्रमवारीत १०व्या स्थानावर तर ६ विकेट घेणारा ट्रेंट बोल्ट कारकिर्दीतील सर्वोच्च १६व्या स्थानावर आला आहे.

३ सामन्यात १०४ धावा करणारा विराट कोहली अव्वल स्थानावर असून या कामगिरीतून त्याला १३ गुण मिळाले आहेत. ज्यामुळे हा खेळाडू आणि दुसऱ्या क्रमांकावरील ऍरॉन फिंच यांच्यातील गुणांचा फरक(४०) वाढला आहे.

सलामीवीर रोहित शर्मा (२१) आणि शिखर धवन (४५) यांनाही नवीन क्रमवारीत अनुक्रमे २ आणि २० स्थानांचा फायदा झाला आहे.

गोलंदाज भुवनेश्वर कुमार(२६) आणि युझवेन्द्र चहल (३०) यांनाही गोलंदाजी क्रमवारीत अनुक्रमे २ आणि २२ स्थानांचा फायदा झाला आहे. अक्षर पटेलला १७ स्थानांचा फायदा होऊन तो ६२व्या स्थानी आला आहे.

भारताने ही मालिका २-१ अशी जिंकल्यामुळे पाकिस्तान टी२० क्रमवारीत अव्वल स्थानी कायम राहणार आहे. त्यांचे १२४ गुण असून न्यूझीलँड संघाचे मात्र १२५वरून १२० गन झाले आहेत.

विंडीज संघाच्या काही दशांश गुणांनी न्यूझीलँड संघ पुढे आहे. भारताला या मालिकेत ३ गुण मिळाले असूनही संघाचे ५वे स्थान कायम आहे.