कोहली,धवनचे खणखणीत अर्धशतक

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने आणि कर्णधार विराट कोहलीने नाबाद अर्धशतके केली आहेत.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मागील काही सामन्यांप्रमाणे या सामन्यातही रोहित शर्माने आपली विकेट लवकर गमावली. त्याला कागिसो रबाडाने बाद केले. त्यानंतर मात्र धवन आणि कोहलीने भारताचा डाव सांभाळला आहे.

या दोघांनीही नाबाद अर्धशतके झळकावताना दुसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचली आहे. शिखरचे हे या वनडे मालिकेतील सलग तिसरे आणि वनडे कारकिर्दीतील २६ वे अर्धशतक आहे.

तसेच विराटचे वनडे कारकिर्दीतील ४६ वे अर्धशतक असून त्याने या वनडे मालिकेतील पहिले अर्धशतक आहे. त्याने या मालिकेत याआधी दोन शतके झळकावली आहेत. त्यामुळे या अर्धशतकाचेही शतकात रूपांतर होते का हे पाहावे लागेल.

हा सामना शिखरचा वनडे कारकिर्दीतील १०० वा सामना आहे. या सामन्यात अर्धशतक करताना शिखरने डेविड वॉर्नरचाही विक्रम मोडला आहे. १०० व्या सामान्यांपर्यंत सर्वाधिक धावा करण्यामध्ये शिखर धवन आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमला ४८०८ धावांसह प्रथम क्रमांकावर आहे.

तर वॉर्नरचने त्याच्या १०० वनडे सामन्यांमध्ये ४२१७ धावा केल्या होत्या.आज शिखर जेव्हा १८ धावांवर पोहोचला त्याचवेळी त्याने वॉर्नरचा हा विक्रम मोडला होता.

सध्या भारत २३ षटकात १ बाद १३८ धावांवर खेळत आहे. विराट ५३ धावांवर आणि शिखर ७४ धावांवर नाबाद आहेत.