विराट-अनुष्का करणार ह्याच महिन्यात लग्न: रिपोर्ट

दिल्ली । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ह्याच महिन्यात लग्न करण्याची शक्यता आहे. मीडियामधील काही रिपोर्ट्सप्रमाणे हे लग्न इटलीमध्ये होणार आहे.

इंडिया टुडेमधील एका वृत्तप्रमाणे ९ ते ११ डिसेंबर या काळात हे दोघे लग्न करू शकतात.

आज विराट कोहली यावर्षीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून तो २६ तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळणार नाही. त्याला वनडे आणि टी२० मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.

त्यानंतर विराट कोहली हा बहुचर्चित दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ३० डिसेंबर रोजी होणाऱ्या सराव सामान्याने होणार आहे.

विराटला वनडे मालिकेत विश्रांती देण्यात आली होती परंतु परवा टी२० संघ निवडतानाही त्याला विश्रांती देण्यात आल्यामुळे क्रिकेट जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या.

विराट आणि अनुष्का हे २०१३ पासून डेटिंग करत असून त्यांची ओळख एका जाहिरात शूटच्या वेळी झाली होती.

२०१५च्या मध्यात ह्या जोडीच्या वेगळ्या होण्याच्या अनेक चर्चा झाल्या होत्या. तसेच अनुष्का विराटबरोबर २०१५च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलँडमध्ये विश्वचषकाच्या वेळी सोबत असल्यामुळे भारतीय संघातील वॅग्ज संस्कृतीवरही जोरदार टीका झाली होती. परंतु तरीही विराटने आपल्याला या नात्याला कधीच लपवून ठेवले नाही तसेच अनुष्काच्या समर्थनार्थ ट्विट करून टीकाकारांची तोंड बंद केली होती.

यावर्षी लग्न केलेल्या खेळाडूंमध्ये भुवनेश्वर कुमार, झहीर खान, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री या दिग्गजांचा समावेश आहे. जर विराटने ह्याच वर्षी लग्न केले तर भारतीय संघातील तो यावर्षी लग्न करणारा दुसरा क्रिकेटपटू ठरणार आहे.