भारतीय क्रिकेटला ‘हेकेखोरपणाच्या’ दावणीशी बांधण्याची आवश्यकता नाही

– अजित बायस
सेंच्युरीयन कसोटी सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय कर्णधार विराट कोहली दोन पत्रकार परिषदांना सामोरे गेला. पहिल्या दिवशी त्याने जी पत्रकार परिषद घेतली त्यात तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणेला संघात न खेळविण्याच्या आपल्या निर्णयाचा बचाव करतांना दिसला होता. तर त्यानंतर साधारणतः दोन-तीन दिवसांनी कोहलीने जी पत्रकार परिषद घेतली त्यात रहानेला संघात स्थान न दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या क्रिकेट तज्ञ आणि क्रीडारसिकांना धारेवर धरतांना त्यांच्या हेतूंविषयीच कोहलीने संशय व्यक्त केला होता. “जी लोकं काही दिवसांपूर्वी रहाणेला संघातून वगळण्याविषयी चर्चा करत होती, तीच लोक आज त्याच्या संघातील समावेशासाठी आग्रही आहेत” अशा आशयाचं विधान कोहलीने या पत्रकार परिषदेत केलं होतं.

या दोन पत्रकार परिषदांमधील कोहलीची ही दोन विधाने नव्याने यासाठी आठवायची की सेंच्युरीयन कसोटीत भारताचा जो दारूण पराभव झाला त्याची बीजे कुठे ना कुठेतरी या दोन विधानांमध्ये रोवली गेलीली आहेत. पहिल्या विधानावेळी कोहलीवर आपल्या निर्णयाचं समर्थन करण्याचा दबाव होता. तसं ते करण्याचा प्रयत्नही त्याने केला, तेव्हा कोहली आणि एकूणच संघव्यवस्थापन ‘बॅकफुट’वर गेलं होतं आणि त्यामुळेच सेंच्युरीयन कसोटीत अजिंक्य रहाणेला संधी दिली जाईल असं चित्र निर्माण झालं होतं. ते अर्थात आशादायी होतं. गोष्टी बिघडायला सुरुवात होते ती त्याच्या दुसऱ्या विधानानंतर. कोहलीची देहबोली, संघनायक म्हणून त्याची कार्यशैली, त्याची निर्णयप्रक्रिया यांचा परिचय असणाऱ्या कुणालाही, या विधानातून तो नेमकं काय सांगू बघत होता, याचा अंदाज त्यावेळीच आला नसता तर नवलंच. दुसऱ्या कसोटीत देखील रहाणेला संधी दिली जाणार नाही, हे यावेळीच स्पष्ट झालं होतं. त्यामुळे सेंच्युरीयनमधील नाणेफेकीनंतर कोहलीने संघातील जे बदल जाहीर केले ते इतरांच्या बाबतीत थोडेसे धक्कादायक असले तरी रहाणेच्या बाबतीत मात्र तसे नव्हते.

विराट कोहली त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. त्याच्या एकूणच आक्रमक स्वभावाचे प्रतिबिंब त्याच्या मैदानावरील देहबोलीत स्पष्टपणे दिसून येतं. गेल्या काही दिवसात या आक्रमकपणाला हेकेखोरपणाची अ’शास्त्री’य जोड देखील मिळालेली आहे. अनिल कुंबळेच्या ना’राजीनामा’ नाट्याच्यावेळी हे आपण अनुभवलेलं आहेच. मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केला तर आक्रमकता आणि हेकेखोरपणा हे मिश्रण काही फारसं लाभदायी नसतंच. सेंच्युरीयन कसोटीच्या संघनिवडीवेळी कोहलीने आपल्या हेकेखोरपणापायीच संघात आश्चर्यकारक बदल केले आणि त्याची किंमत भारतीय संघाला शृंखला गमावून चुकवावी लागली. संघ निवडीत फक्त कर्णधाराचाच समावेश नसतो तर प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापन देखील ही प्रक्रिया प्रभावित करत असतात. यामुळे या पराभवाचे खापर एकट्या कोह्लीवर फोडून चालणार नाही. प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री आणि संघ व्यवस्थापन देखील या पराभवाला तितकंच जबाबदार आहे. मुळात भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रींच्या योग्येतेची ‘कसोटी’ बघणारा दौरा म्हणून देखील या शृंखलेचा पंचनामा होणं गरजेचं आहे. अनिल कुंबळेसारख्या शिस्तप्रिय गुरुजींची ‘शिकवण’ नाकारून आपल्याला पूरक अशा शास्त्रीना त्याठिकाणी बसवणं हे कदाचित ‘बीसीसीआय प्रायव्हेट लिमिटेड’ला परवडू शकेलही पण त्यासाठी भारतीय संघाला वेठीस धरण्याची काहीच आवश्यकता नाही.

कुठलाही खेळाडू हरण्यासाठी खेळत नसतो, तो जिंकण्यासाठीच कसोशीने प्रयत्न करतो, हे मान्य करून देखील कर्णधाराचेही ‘फेव्हरीट’ असतात या गोष्टीकडे देखील आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. आजघडीला रोहित शर्मा हा एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी प्रकारातील भारतीयच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील महत्वाचा खेळाडू असला तरी कसोटी क्रिकेटमध्ये आणि प्रामुख्याने भारतीय उपखंडाबाहेर त्याला अजून स्वतःला सिद्ध करायचयं. त्याला ती संधी देतांना अजिंक्य रहाणेवर अन्याय होणार नाही आणि परिणामी त्याची झळ भारतीय संघाला बसणार नाही, याची काळजी संघ व्यवस्थापनाने आणि कर्णधार कोह्लीनेही घेणं गरजेचं आहे. कोहलीची वैयक्तिक कामगिरी जरी सेंच्युरीयन कसोटीत चांगली झाली असली तरी संघनायक म्हणून त्याच्या मर्यादा या दौऱ्यात स्पष्ट होऊ लागल्या आहेत.

कपिल देव नंतर भारताला कायमच एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूची उणीव भासत आलीये. त्यांचा वारसदार म्हणून गेल्या काही महिन्यात हार्दिक पंड्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्यात. पण या कसोटीत संघाला आत्यंतिक निकड असतांना ज्या बेजबाबदार पद्धतीने तो धावबाद झाला ते फारच विचित्र होतं. तो जश्या पद्धतीने धावबाद झाला त्यावरून त्याला क्रिकेटमधील बेसिक नियमांचा सुद्धा विसर पडलाय की काय, अशी शंका यावी. तो अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन आहे, अशी सूट त्याला याबाबतीत देता येत नाही कारण कर्णधार विराट कोह्लीनंतर क्रिकेटच्या तिन्हीही प्रकारातील संघात स्थान पक्कं असणारा तो एकमेव खेळाडू आहे. तेव्हा पंड्याकडून अधिक समंजसपणाची अपेक्षा आहे.

क्रिकेटमध्ये ‘कॅचेस विन्स मॅचेस’ असं म्हटलं जातं ते काही उगाच नाही, सुमार दर्जाचे क्षेत्ररक्षण हे देखील सेंच्युरीयन कसोटीतील पराभवाचे एक महत्वाचे कारण ठरले. या क्षेत्रात भारताला सुधारणेला मोठ्या प्रमाणात वाव आहे. अजिंक्य रहाणेचं संघात असणं यादृष्टीने देखील महत्वाचं ठरतं. तो स्लीपमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. पुढच्या सामन्यात पार्थिव ऐवजी दिनेश कार्तिकला संधी दिली जाईल असं दिसतंय, पण आता तरी अजिंक्य रहाणेवर विश्वास दाखवणार का, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. (सेंच्युरीयनच्या पराभवानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने माध्यमांच्या प्रतिनिधींवर ज्या पद्धतीने चिडचिड केली त्यावरून तरी याबाबतीत शंकाच आहे) दोन्ही कसोटीतील पराभवातून योग्य ते धडे घेऊन संघाला ‘व्हाईट वाश’ मिळण्यापासून वाचविणे एवढेच सध्या तरी आपल्या हातात आहे.

ता.क- आजपासून ठीक १० वर्षापूर्वीची गोष्ट. १७ जानेवारी २००८. ऑस्टेलीयातील पर्थचे मैदान. ३ सामन्यांच्या भारत-ऑस्टेलीया कसोटी शृंखलेतील शेवटचा सामना. सामना सुरु होण्यापूर्वी अनिल कुंबळेच्या खात्यात ५९८ बळी जमा. कुंबळे ६०० बळींचा पल्ला गाठणार का, याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले. सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांनी राहुल द्रविडला याविषयी छेडल. “कुंबळेच्या ६०० विकेट्स जेव्हा कधी पूर्ण व्ह्यायच्यात ते होवो, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की, त्या ६०० व्या विकेटच्या वेळी धावफलकावर लिहलेलं असावं, ‘कॉट द्रविड, बोल्ड कुंबळे’, राहुल द्रविडचं पत्रकारांना उत्तर.

ऑस्टेलीयाचा डाव सुरु. आंड्र्यू सायमंड्स स्ट्राईकवर. कुंबळेने बॉल टाकला. कुंबळेच्या बॉलने हलकेच सायमंड्सच्या बॅटचं चुंबन घेतलं आणि तो स्थिरावला पहिल्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या राहुल द्रविडच्या हातात जाऊन. मुथैया मुरलीधरन आणि शेन वार्न यांच्यानंतर ६०० विकेट घेणारा कुंबळे जगातला तिसराच खेळाडू ठरला. इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला गेला – ‘कॉट द्रविड, बोल्ड कुंबळे’