कोहली आणि संघ सहकाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता

क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असणाऱ्या भारतीय क्रिकेट बोर्डाचे खेळाडू मात्र त्यांना मिळणाऱ्या वेतनामुळे खुश नाहीत. त्याचमुळे भारतीय क्रिकेटपटूंनी वेतन वाढीची मागणी केली होती. आणि विशेष म्हणजे ही मागणी बीसीसीआय पूर्ण करण्याची चिन्हे आहेत.

भारतीय कर्णधार विराट कोहली, एम एस धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वेतनवाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीशी चर्चा केली आहे. या चर्चेनुसार अ श्रेणी असणाऱ्या क्रिकेटपटूंना १२ कोटी तसेच कर्णधाराला त्याहीपेक्षा जास्त, ब श्रेणी असणाऱ्या क्रिकेटपटूंना ८ कोटी तर क श्रेणीतील क्रिकेटपटूंना ४ कोटी वर्षाला देण्याची मागणी केली आहे.

सध्या असणाऱ्या करारानुसार अ श्रेणी क्रिकेटपटूंना २ कोटी, ब श्रेणीत असणाऱ्यांना १ कोटी आणि क श्रेणीत असणाऱ्या क्रिकेटपटूंना ५० लाख वर्षाला वेतन मिळते.

भारतीय कर्णधार कोहली आणि संघसहकारी यांनी वेतन वाढीची मागणी केली आहे. याचे मुख्य कारण कारण ऑस्ट्रेलियन आणि इंग्लंड खेळाडूंचे वेतन जास्त असलयाचे मानले जात आहे. ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टीव्ह स्मिथचे वेतन २ मिलियन डॉलर्स (जवळ जवळ १२ कोटी) इतके आहे. तसेच इंग्लंड कर्णधार जो रूटचेही याच दरम्यान वेतन आहे.

सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे ” ही चर्चा जवळ जवळ ४ तास चालू होती होती तसेच ही चर्चा भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांच्या खेळाडूंच्या वेतनातील फरकावरच केंद्रित होती.”

ही मागणी अजूनतरी अधिकृत मान्य झालेली नाही परंतु ही मागणी पूर्ण करण्यासाठी एकमत झाले आहे असे या चर्चेतून दिसून आले आहे.

या चर्चेदरम्यान देशांतर्गत क्रिकेट खेळणारे आणि रणजी खेळणाऱ्या खेळाडूंच्याही वेतनवाढीची चर्चा झाली. सध्या त्यांना बीसीसीआयच्या एकूण कमाईतील १३% रक्कम मिळते.

याबद्दल सूत्रांनी सांगितले, ” सध्याच्या घडीला या खेळाडूंच्या कारकिर्दीचा कालावधी कमी असतो.त्यांच्यापैकी प्रत्येकजण हा उच्च शिक्षित किंवा नोकरीची हमी असलेला नसतो. त्यामुळे त्यांना स्थैर्य देण्याचा प्रयत्न आहे.”

याबद्दल आज सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती मुंबईत पुन्हा चर्चा करणार आहे. त्यानुसार बीसीसीआयच्या एकूण कमाईतील २६ % रक्कम क्रिकेटपटूंना देण्यात येणार आहेत. ज्यामध्ये प्रक्षेपण हक्कांसहित प्रत्येक स्त्रोत्रातून येणाऱ्या कमाईचा समावेश आहे.असा खेळाडूंबरोबरचा करार सर्वप्रथम जगमोहन दालमिया यांच्या नेतृत्वाखाली मान्य झाला होता.