विराट-अनुष्काच्या स्वागत समारंभाला आलेला हा खास पाहुणा कोण?

मुंबई । विराट कोहली आणि अनुष्का शर्माने आपला दुसरा स्वागत समारंभ देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात ठेवला होता. यावेळी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. परंतु एक खास पाहुणा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तो बॉलीवूडमधूनही नव्हता किंवा कोणता मोठा खेळाडूही नव्हता.

असे असताना हा खास पाहुणा कोण याचे सर्वांनाच कोडे पडले होते. विशेष म्हणजे त्याचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. हा पाहुणा क्रिकेट प्रेमींना चांगलाच माहित आहे.

त्याचे नाव गायन सेनानायके असे असून तो श्रीलंका संघाचा मोठा चाहता आहे. कर्णधार कोहलीने त्याला या समारंभाला बोलवले होते. सेनानायके श्रीलंका संघाला पाठिंबा द्यायला भारतात आला होता आणि मुंबईमध्ये झालेल्या शेवटच्या टी२० सामन्यानंतर तो मुंबईतच या कार्यक्रमासाठी थांबला होता.

गायन सेनानायके दिव्यांग असून तो श्रीलंका संघाला पाठिंबा देण्यासाठी सतत संघाबरॊबर फिरत असतो. तो परदेश दौरेही करतो. काल त्याने या कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचीही भेट घेतली.

भारतीय संघ कर्णधार कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत २ महिन्यांच्या दौऱ्यासाठी जाणार आहे. उद्या सकाळी भारतीय संघ तिकडे रवाना होईल.