तुम्हाला माहित आहे का विराटला कोणता क्रिकेटचा प्रकार आवडतो?

दिल्ली । कर्णधार विराट कोहली सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ५०पेक्षा जास्त सरासरी राखून आहे. त्याची वनडेतील सरासरी ५५.७४, कसोटीत ५३.७९ आणि टी२०मध्ये ५२.८६ अशी आहे. जगात तिन्ही प्रकारात ५० पेक्षा जास्त सरासरी असणारा तो एकमेव खेळाडू आहे.

असे जरी असले तरी विराटला क्रिकेटमधील कसोटी प्रकार जास्त आवडतो. बीसीसीआय टीव्हीसाठी चेतेश्वर पुजाराने काल विराटची मुलाखत घेतली. तेव्हा विराट याबद्दल बोलताना विराट म्हणाला, ” माझा आवडता क्रिकेट प्रकार हा कसोटी आहे. एक गोलंदाज किंवा फलंदाज म्ह्णून कसोटीत चांगली कामगिरी करणे आणि त्यापासून मिळणार आनंद आपल्याला नक्कीच माहित आहे. “

“तुम्हाला कसोटीत कठीण काळात फलंदाजी किंवा गोलंदाजी करावी लागते. तेव्हा तुम्हाला गेम बनवावा लागतो. क्रिकेटमधील कसोटी प्रकारात समाधान हे जास्त मिळते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्टेडियम भरलेले असते आणि त्यामुळे मजा येते. माझे आवडते शतक हे ऍडलेड येथे चौथ्या डावात केलेले शतक आहे तर द्विशतक हे मुंबई कसोटीत केलेले द्विशतक आहे.”