पहिल्या विजयानंतरही कर्णधार कोहलीला झाला लाखोंचा दंड, जाणून घ्या कारण

मोहाली। शनिवारी(13 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडलेल्या सामन्यात बेंगलोरने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. हा बेंगलोरचा या आयपीएल मोसमातील पहिलाच विजय ठरला आहे.

मात्र असे असले तरी बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला षटकांची गती कमी राखल्याने 12 लाख रुपयांचा दंड झाला आहे.

याबद्दल आयपीेएलच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘आयपीएलच्या आचारसंहितेतील किमान षटकांची गती या नियमाअंतर्गत षटकांची गती कमी राखल्याचा हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा हा या मोसमातील पहिलाच गुन्हा आहे. विराट कोहलीला 12 लाखांचां दंड ठोठावला आहे.’

विराटच्या आधी काही सामन्यांपूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेलाही षटकांची गती कमी राखल्याने प्रत्येकी 12 लाखांचा दंड झाला होता.

शनिवारी झालेल्या या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 173 धावा केल्या. पंजाबकडून ख्रिस गेलने 64 चेंडूत नाबाद 99 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 5 षटकार मारले.

पंजाबने दिलेल्या 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून विराटने 67 धावांची तर एबी डिविलियर्सने नाबाद 59 धावांची खेळी करत बेंगलोरच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

गोलंदाजीत पंजाबकडून मोहम्मद शमी आणि कर्णधार आर अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली. तर बेंगलोरकडून युजवेंद्र चहलने दोन विकेट्स तसेच मोहम्मद सिराज आणि मोईन अलीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

यष्टीरक्षक रिषभ पंतने घेतला अफलातून झेल, पहा व्हिडिओ

मुंबई इंडियन्ससाठी आजचा ऐतिहासिक सामना, जाणून घ्या कारण