व्हिडिओ: कोहली म्हणतो, सामन्याआधी विलियम्सनला या गोष्टीची करुन देणार आठवण!

मँचेस्टर। आज(9 जूलै) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 2019 विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना रंगणार आहे. या सामन्यात तो संघ विजयी ठरेल तो थेट अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे.

त्याचबरोबर या सामन्यात एक खास योगायोगही होणार आहे. 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकातही भारत आणि न्यूझीलंड संघात उपांत्य सामना झाला होता. विशेष म्हणजे त्यावेळीही भारताचे नेतृत्व विराट कोहली आणि न्यूझीलंडचे नेतृत्व केन विलियम्सन करत होता.

त्यामुळे आता 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा आपल्या संघांचे कर्णधार म्हणून हे दोघेही एकमेकांविरुद्ध विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळणार आहेत.

आणखी खास गोष्ट म्हणजे 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारताकडून न्यूझीलंड विरुद्ध रविंद्र जडेजाही खेळला होता. तर न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथीही या उपांत्य सामन्यात खेळले होते. 2019 च्या वनडे विश्वचषकातही हे खेळाडू आपल्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

या योगायोगाबद्दल विराट कोहली आजच्या सामन्याआधी म्हणाला, ‘आम्ही जेव्हा उद्या भेटू तेव्हा मी विलियम्सनला याबद्दल(2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकाबद्दल) आठवण करुन देईल. 11 वर्षांनंतर पून्हा वरिष्ठ विश्वचषकात आम्ही आमच्या देशांचे नेतृत्व करत आहोत, याची जाणीव होणे मस्त आहे.’

‘त्या विश्वचषकातील(2008 चा 19 वर्षांखालील विश्वचषक) आमच्या आणि त्यांच्याही बॅचमधील तसेच अन्य संघातीलही खेळाडूंनी आपल्या देशाच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवले आणि अजूनही ते खेळत आहे. मला वाटतं ती खूप छान आठवण आहे. मला आणि त्याला असा दिवसही कधी येईल असे वाटले नव्हते.’

2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात झालेला हा उपांत्य सामना भारताने 3 विकेट्सने जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विश्वचषकही जिंकला होता.

न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या त्या उपांत्य सामन्यात विराटला सामनावीर पुरस्कार मिळाला होता. त्याने न्यूझीलंड विरुद्ध 43 धावा केल्या होत्या आणि 2 विकेट्सही घेतल्या होत्या. यातील एक विकेट ही विलियम्सनची होती. याच सामन्यात विराटचा झेल विलियम्सनने घेतला होता.

विलियम्सनच्या विकेटची आठवण विराटला सामन्याआधी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत करुन दिल्यावर विराटने आश्चर्य व्यक्त केले आहे. विलियम्सनच्या विकेटबद्दल विराट आश्चर्याने म्हणाला, ‘मला केनची विकेट मिळली होती, खरंच? मला माहित नाही असे परत होईल की नाही.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

काय आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सामन्यांचा इतिहास?

टीम इंडियाने असा साजरा केला एमएस धोनीचा वाढदिवस, पहा व्हि़डिओ

गांगुली, सचिन नंतर किंग कोहली असा विक्रम करणारा केवळ तिसरा भारतीय