दिग्गज ब्रायन लाराच्या विश्वविक्रमाला विराट कोहलीकडून धक्का

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी (2 आॅगस्ट) पहिल्या डावात शतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने एक खास विश्वविक्रमही रचला आहे.

विराटने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 7000 धावांचा टप्पा गाठणारा कर्णधार ठरला आहे. त्याने 124 डावात हा टप्पा पार केला आहे.

याआधी हा विक्रम महान फलंदाज ब्रायन लारा यांच्या नावावर होता. त्यांनी कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 164 डावात 7000 धावांचा टप्पा पार केला होता.

विशेष म्हणजे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4000, 5000 आणि 6000 धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीतही अव्वल क्रमांकावर आहे. या धावा त्याने अनुक्रमे 73, 93 आणि 106 डावात पूर्ण केल्या होत्या.

याबरोबरच कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावा करणारा विराट हा भारताचा चौथाच खेळाडू आहे. याआधी एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांनी हा कारनामा केला आहे.

विराटने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 105 सामने खेळले असून यात 124 डावात 67.70 च्या सरासरीने 7109 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 28 शतकांचा आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच त्याने भारताचे नेतृत्व करताना कसोटीत 36 सामन्यात 3605 धावा केल्या आहेत. विराट कर्णधार म्हणून भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे.

त्याचबरोबर त्याने वनडेत 52 सामन्यात 3059 धावा केल्या आहेत आणि टी 20मध्ये 17 सामन्यात 445 धावा केल्या आहेत.

एमएस धोनीने डिसेंबर 2014 मध्ये कसोटीतून निवृत्ती स्विकारल्याने विराट जानेवारी 2015 पासून भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे. तसेच धोनीने जानेवारी 2017 मध्ये मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधीलही कर्णधारपद सोडल्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठीही भारतीय संघाच्या नेतृत्वाची धूरा विराटकडे सोपवण्यात आली.

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटने पहिल्या डावात गुरुवारी 225 चेंडूत 149 धावा केल्या. यात त्याने 22 चौकार आणि 1 षटकार मारला. विराटचे हे इंग्लंडमधील कसोटीत पहिलेच शतक आहे. तसेच कसोटी कारकिर्दीतील एकूण 22 वे शतक आहे.

विराटच्या या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 274 धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

यापूर्वी जगातील कोणत्याच क्रिकेट संघाच्या कर्णधाराने असा निर्णय घेतला नसेल

१९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेने दिला धक्का

इंग्लंड येणार गोत्यात, महत्त्वाचा खेळाडू जायबंदी