आजचा सामना विराटचा वनडे कारकिर्दीतील २००वा सामना

भारतीय संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आज त्याचा २०० वा वनडे सामना खेळणार आहे. आज मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भारत विरुद्ध न्यूजीलँडमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना रंगणार आहे.

हा सामना विराटसाठी खास असणार आहे. तो त्याच्या वनडे कारकिर्दीतील २००वा सामना खेळून महत्वाचा टप्पा गाठणार आहे. त्यामुळे आता तो संघातील एक अनुभवी खेळाडू म्हणूनही ओळखला जाईल. कारण सध्या फक्त एमएस धोनी हा त्याच्यापेक्षा जास्त वनडे खेळणारा खेळाडू संघात आहे.

२००८ मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषकावर नाव कोरले होते. या नंतर लगेचच त्याची श्रीलंका दौऱ्यावर वरिष्ठ भारतीय संघात वनडे मालिकेसाठी निवड झाली होती.

या मालिकेतील पहिलाच सामना खेळण्याआधी भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे कर्णधार एमएस धोनीने १८ वर्षीय विराटला संधी दिली आणि विराटाचे १८ ऑगस्ट २००८ ला भारतीय संघात पदार्पण झाले. या सामन्यात विराटने सलामीला येऊन १० धावा केल्या.

आत्तापर्यंत त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीत ३० शतक आणि ४५ अर्धशतकांसहित जवळ जवळ ५५ चा सरासरीने ८७६७ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तो ३२ वेळा नाबाद राहिला आहे. तर १८३ ही त्याची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या त्याने आशिया कप २०१२ मध्ये पाकिस्तान विरुद्ध केला होता.त्याच बरोबर गोलंदाजीत ४ बळीही त्याच्या नावावर आहेत.

विराट वनडे कारकिर्दीत २०० सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्रिकेट इतिहासातील ७२ वा तर १३वा भारतीय खेळाडू ठरणार आहे.