बुमराह आणि भुवनेश्वरमुळे भारताची गोलंदाजी भक्कम: विराट कोहली

पुणे । भारताचा कर्णधार विराट कोहली याने भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार यांचे कौतुक केले आहे तसेच या दोघांमुळे भारताचीगोलंदाजी भक्कम झाली असल्याचेही म्हटले आहे. 

“दोन्ही वेगवान गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांनीही त्यांना चांगली साथ दिली. दोघेही गोलंदाज चांगल्या लयमध्ये दिसत आहेत आणि त्यांनी सामन्यात खूपच चांगली गोलंदाजी केली. खेळपट्टी थोडी मध्यम गतीची होती त्यामुळे गोलंदाजांना मदत मिळत होती आणि आमच्या गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली आणि नियमित कालांतराने विकेट्स मिळवल्या.” असे विराट म्हणाला. 

भुवनेश्वर कुमारने दुसऱ्या वनडे सामन्यात ३ विकेट्स मिळवल्या आणि बुमराने २ विकेट्स काढल्या. यामुळेच न्यूझीलंडला २३० धावांत रोखता आले. त्यानंतर सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला दिनेश कार्तिकच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ४६व्या षटकात हे लक्ष पार केले.

“धवनचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्याच्या बॅटवर चेंडू व्यवस्थित येत आहे. त्याचबरोबर  दिनेश कार्तिकनेही महत्त्वपूर्ण धावा करून संघाला विजय मिळवून दिला.” असे विराट म्हणाला.

न्यूझीलंड विरुद्धची ही मालिका आता १-१ अशी बरोबरीत आहे. शेवटचा आणि निर्णायक सामना कानपुर येथे होणार आहे.

विराट म्हणाला “कानपुरमधील वनडे सामन्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मालिकेत पुनरागमन करण्याबद्दल आम्ही पहिला वनडे सामना हरल्यानंतर बोललो होतो आणि आम्ही ते करून दाखवले आहे. पुण्याप्रमाणेच आम्ही कानपुरमध्ये ही चांगला खेळ करू आणि मालिका जिंकू.”