विराट भारीच, पण पाकिस्तानात धावा जमवणे अवघड

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी कौतुक केले आहे. याचबरोबर एक आव्हानही दिले आहे. विराट मागील काही वर्षांपासून चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. परंतु आर्थर यांच्या म्हणण्यानुसार विराटला पाकिस्तानात खेळणे जड जाईल.

आर्थर म्हणाले, ” कोहली हा खूप विलक्षण खेळाडू आहे, पण आमच्या संघाविरुद्ध पाकिस्तानमध्ये त्याला शतक करण्यास कठीण जाईल. कोहलीला सगळ्या देशांविरुद्ध धावा करताना बघणे आनंददायी आहे. तसेच त्याची फलंदाजी बघतानाही मजा येते. पण तरीही आमचे गोलंदाज त्याच्यासाठी पाकिस्तानमध्ये धावा करणे अवघड करतील.”

कोहलीने नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना पहिल्या वनडे सामन्यात शतक केले होते. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील ३३ वे शतक होते. याबरोबरच त्याने आत्तापर्यंत वनडे खेळलेल्या ९ देशातही शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. मात्र विराटला अजून पाकिस्तानमध्ये जाऊन खेळायची संधी मिळालेली नाही.

विराट २०१७ यावर्षात वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला होता. त्याने या वर्षात खेळताना ६ शतके आणि ७ अर्धशतकांसह ७६.८४ च्या सरासरीने १४६० धावा केल्या आहेत.

तसेच त्याला यावर्षीचा आयसीसीचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि सर्वोत्कृष्ट वनडे फलंदाज म्हणून गौरवण्यात आले होते. सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसाठी त्याला सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार देण्यात आला होता.

हा पुरस्कार मिळवणारा तो फक्त चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि आर अश्विन यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

विराटला २०१२ मधेही आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट वनडे फलंदाजाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच त्याची क्रिकेटच्या तीनही प्रकारातील सरासरी हि ५० पेक्षा जास्त आहे.