विराट कोहली कौंटी क्रिकेट खेळून इंग्लंड दौऱ्याची करणार तयारी

भारताचा कर्णधार विराट कोहलीची आत्तापासूनच इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरु झाली आहे.भारतीय संघाचा जुलैमध्ये इंग्लंड दौरा सुरु होणार आहे.

या दौऱ्यात ५ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी २० सामने होणार असून ३ जुलै पासून टी २० मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे.

त्यासाठी विराटने जून महिन्यात कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. विराटची आत्तापर्यंतची इंग्लंडमधील कामगिरी खास अशी झालेली नाही. त्याने इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्यात १३.४० च्या सरासरीने १३४ धावाच केल्या आहेत.

त्यामुळे या दौऱ्याच्या आधी सराव म्हणून विराट सरे संघाकडून कौंटी क्रिकेट खेळणार आहे. विशेष म्हणजे विराट हा सरे संघाकडून कौंटी खेळणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरणार आहे. या संघाकडून याआधी अनेक देशांचे दिग्गज खेळाडू खेळले आहेत. आता यात विराटचाही समावेश होणार आहे.

पण मात्र कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी विराटला अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटीला मुकावे लागणार आहे. अफगाणिस्थान जून महिन्यात हा कसोटी सामना खेळण्यासाठी भारतात येणार आहे.

तसेच अफगाणिस्तानचे या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण होणार आहे. हा सामना १४ जून ते १८ जून असा होईल. याचवेळी ९ जून ते २८ जून दरम्यान कौंटी क्रिकेटमध्ये सरे संघाचे ३ सामने होणार आहेत. यात त्यांचा सामना हॅम्पशायर, सॉमरसेट आणि यॉर्कशायर या तीन संघाशी होणार आहे.

विराटबरोबरच कौंटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारा, आर अश्विन आणि इशांत शर्मा हे भारताचे खेळाडू खेळणार आहेत.