विराट कोहलीबद्दलच्या या वावड्या निरर्थक

पुणे । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत खेळणार आहे. विराट या सामन्यात खेळणार नसल्याच्या अफवा असल्याचे एमएसके प्रसाद म्हणाले.

विराटला तिसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती हवी असल्याची चर्चा होती शिवाय त्याने तशी मागणी केल्याचेही बोलले जात होते. परंतु एमएसके प्रसाद यांनी यावर पडदा टाकत विराट सर्व कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.

” यात कोणतीही शंका नाही. विराट संपूर्ण कसोटी मालिकेसाठी उपलब्ध आहे. कसोटीमालिकेनंतर आम्ही त्याला विश्रांती देण्याचा विचार करतोय. त्याला विश्रांतीची गरज आहे आणि रोटेशन पद्धत कर्णधारालाही लागू होते. ” असे निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद म्हणाले.

” भारतीय संघाची पहिल्या दोन सामन्यांसाठी निवड झाली आहे. आणि रहाणेची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. मला हे कळत नाही की रहाणेची उपकर्णधारपदी निवड झाल्यामुळे विराट तिसरी कसोटी खेळणार नाही असा अंदाज कसा लावला गेला? ” असेही प्रसाद पुढे म्हणाले.

यदाकदाचित आपणास माहित नसेल तर-
उपकर्णधाराची निवड ही बीसीसीआय केवळ संघ परदेश दौऱ्यावर जाणार असेल तरच करते. श्रीलंका संघ भारतात खेळत असूनही काल रहाणेच्या नावाची यासाठी निवड झाली. याबद्दल बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर देणे टाळले.