विराट कोहलीने रचला इतिहास; असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच खेळाडू

पोर्ट ऑफ स्पेन। वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना रविवारी(11 ऑगस्ट) क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर पार पडला. या सामन्यात भारताने डकवर्थ लूईस नियमानुसार 59 धावांनी विजय मिळवला.या विजयात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.

याबरोबरच विराटने वेस्ट इंडीज विरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रमही केला आहे. त्याने या सामन्यात 125 चेंडूत 120 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 1 षटकार मारला. यामुळे विराटच्या आता वेस्ट इंडीजविरुद्ध वनडेमध्ये 35 सामन्यात 2032 धावा झाल्या आहेत.

विराटच्या आधी वेस्ट इंडीज विरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचे माजी दिग्गज क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांच्या नावावर होता. त्यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध 64 सामन्यात 1930 धावा केल्या आहेत. पण विराटने रविवारी 19 धावा करताच त्यांच्या या विक्रमाला मागे टाकले.

तसेच विराटने वेस्ट इंडीज विरुद्ध 2000 वनडे धावांचा टप्पाही पार केला. त्यामुळे तो वेस्ट इंडीज विरुद्ध 2000 वनडे धावा करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 279 धावा केल्या होत्या. भारताकडून विराट बरोबरच श्रेयस अय्यरने चांगली कामगिरी करताना 71 धावांची अर्धशतकी खेळी केली. वेस्ट इंडीजकडून कार्लोस ब्रेथवेटने सर्वाधक 3 विकेट घेतल्या.

त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे वेस्ट इंडीजचा डाव 46 षटकांचा करण्यात आला तसेच त्यांना 270 धावांचे आव्हान देण्यात आले. पण वेस्ट इंडीजचा डाव 42 षटकात 210 धावांवरच संपुष्टात आला.

वेस्ट इंडीजकडून एव्हिन लूईसने 65 आणि निकोलास पूरनने 42 धावांची चांगली खेळी केली. पण अन्य फलंदाज लवकर बाद झाले. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

#वेस्ट इंडीज विरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

2032 – विराट कोहली (35 सामने)

1930 – जावेद मियाँदाद (64 सामने)

1708 – मार्क वॉ (47 सामने)

1666- जॅक कॅलिस (40 सामने)

1624 – रमिझ राजा (53 सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

अफगाणिस्तान बोर्डाने मोहम्मद शहजादला सुनावली ही मोठी शिक्षा…

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड नाही तर थायलंडच्या महिला क्रिकेट संघाने केला हा मोठा विश्वविक्रम