#IPL! असा खेळाडू ज्यानं कधीच संघ बदलला नाही!

आयपीएलमध्ये आत्तापर्यंतच्या सर्व मोसमात खेळलेल्या खेळाडूंचे एकदातरी संघ बदलले आहेत. पण याला अपवाद ठरला तो एका खेळाडूचा आणि हा खेळाडू म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीचा.

विराट आयपीएलमध्ये सर्व मोसमात एकाच संघाकडून खेळणारा एकमेव खेळाडू ठरणार आहे. याआधी एमएस धोनी, सुरेश रैना हे सुद्धा चेन्नई सुपर किंग्स या एकाच संघाकडून खेळणारे खेळाडू होते, परंतु २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांसाठी या संघावर बंदी आल्याने या दोन्ही खेळाडूंना संघ बदलावा लागला होता.

विराटला २००८ साली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने संघात समाविष्ट करून घेतले होते. विशेष म्हणजे याच वर्षी विराटच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. तसेच त्याचे याच वर्षी वरिष्ठ भारतीय संघातही पदार्पणही झाले होते.

त्याच्या चांगल्या कामगिरीच्या वाढत्या आलेखामुळे तो कधीही बंगलोर संघातून बाहेर पडला नाही. तसेच काही वर्षातच त्याला बंगलोर संघाचे कर्णधारपदही मिळाले. त्याने २०१३ साली बंगलोर संघाचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली.

त्याच्या नेतृत्वाखाली बंगलोर संघाने २०१६ साली आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती. पण त्यांना सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. २०१६ यावर्षीच्या आयपीएल मोसमात विराट सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही बनला होता. त्याने ८१.०८ च्या सरासरीने ९७३ धावा केल्या होत्या.

विराटने आत्तापर्यंत १४९ आयपीएल सामने खेळले आहेत. यात त्याने ३७.४४ च्या सरासरीने ४४१८ धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या ४ शतके आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे. तर ११३ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. विशेष म्हणजे त्याने त्याची ही चारही शतके २०१६ च्या मोसमात केली आहेत.