कोणत्याच भारतीय कर्णधाराला न जमलेली गोष्ट विराट कोहलीने करुन दाखवली

पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु असून या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 4 बाद 132 धावा केल्या आहेत. तसेच ते 175 धावांनी आघाडीवर आहेत.

या सामन्यात भारताचा पहिला डाव 283 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे आॅस्ट्रेलियाने 43 धावांची आघाडी घेतली होती.

भारताकडून या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात 257 चेंडूत 123 धावा केल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. हे विराटचे आॅस्ट्रेलियन भूमीतील आॅस्ट्रेलिया विरुद्धचे एकूण 6 वे कसोटी शतक ठरले आहे. याबरोबरच त्याने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये 1200 धावांचा टप्पाही पार केला आहे.

यावर्षी कसोटीमध्ये 1000 आणि त्यापेक्षा जास्त धावा करणारा विराट एकमेव फलंदाज आहे. त्याने यावर्षी 12 कसोटी सामने खेळताना 21 डावात 1223 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 5 शतकांचा समावेश आहे.

या 1223 धावांमधील 1039 धावा या विराटने भारताबाहेर केल्या आहेत. त्यामुळे एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात 1000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव भारतीय कर्णधार ठरला आहे. तसेच असा पराक्रम करणारा जगातील एकूण तिसराच कर्णधार ठरला आहे.

याआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ आणि आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार बॉब सिंप्सन यांनी परदेशात खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

स्मिथने 2008 मध्ये परदेशात खेळताना 11 कसोटी सामन्यात 1212 धावा केल्या होत्या. तसेच सिंप्सन यांनी 1964 मध्ये परदेशात 9 सामन्यात 1018 धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला मानावे लागले कांस्य पदकावर समाधान

पीव्ही सिंधूची ऐतिहासिक सुवर्णमय कामगिरी

यष्टीरक्षक रिषभ पंतने फक्त २ सामन्यात घेतले तब्बल १५ झेल