पुणे: टीम इंडियाला पाहण्यासाठी कोथरूडमध्ये मोठी गर्दी !

पुणे । आज भारत विरुद्ध न्यूजीलँड यांच्यातील दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघाचे पुण्यात आगमन झाले. यावेळी संघातील खेळाडूंनी पुणेकर क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा अष्टपैलू शिलेदार केदार जाधवच्या घरी पाहुणचार घेतला.

यावेळी टीम इंडियामधील खेळाडूंची छबी टिपण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाहत्यांची गर्दी केदार जाधव राहत असलेल्या कोथरुड मधील सिटीप्राईड जवळील पॅलॅडियम या निवासस्थानाजवळ झाली होती. त्यामुळे येथे काही काळ ट्राफिक जामही झाले होते.

यावेळी संघातील बहुतेक खेळाडू केदारच्या घरी आले असल्याचे बोलले जात आहे. त्यात माजी कॅप्टन कूल एमएस धोनी, हार्दिक पंड्या, सलामीवीर रोहित शर्मासह अन्य क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

विशेष म्हणजे सोमवारी रात्री १०-११ वाजेपर्यंत आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला पाहण्यासाठी चाहते वाट पाहत होते.

भारत विरुद्ध न्यूजीलँड दुसरा वनडे सामना परवा एमसीए स्टेडियम गहुंजे येथे होणार आहे. यासाठी उद्या अर्थात मंगळवारी सकाळी ९ ते १२ यावेळेत न्यूजीलँड संघ तर २ ते ५ या यावेळेत भारतीय संघ सराव करणार आहे.

याआधी भारतीय संघ पुण्याच्या मैदानात २ वनडे सामने खेळला आहे. त्यातील १ वनडे इंग्लंड विरुद्ध तर १ वनडे ऑस्ट्रेलिया विरुद्ध झाली आहे. यात भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तर इंग्लंड विरुद्ध विजय मिळवला होता.

पुणे शहरात गेले काही आठवडे पाऊस पडत आहे. दिवाळीला विश्रांती घेतल्यावर काल शहरात पुन्हा पावसाने हजेरी लावली. ह्या सामन्याच्या वेळी पाऊस पडू नये अशीच अपेक्षा चाहते करत असणार आहे.