विराट कोहलीच्या नावावर आणखीन एक विक्रम !

गुरुवारी कोलंबो येथे झालेल्या श्रीलंका विरुद्ध भारत मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेवर १६८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करत कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्या शतकांच्या जोरावर ३७५ धावांचा डोंगर उभारला. श्रीलंकेचा संघ २०७ धावांत सर्वबाद झाला.

या मालिकेत आणि सामन्यात विराट कोहलीने आपल्या नावे अनेक विक्रम केले. मग तो श्रीलंकेविरुद्ध २००० धावा करणे असो वा जागतिक क्रिकेटमध्ये सार्वधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहचणे असो.

विराट कोहलीचे श्रीलंकेबरोबर एक अतूट नाते आहे हे तर आपल्या सर्वांना माहित असेलच. म्हणजे श्रीलंकेत २००८ मध्ये आपला पहिला सामना खेळणे असो वा मलिंगाच्या यॉर्कर्सवर षटकार मारणे असो. विराटसाठी नेहमीच श्रीलंका स्पेशल राहिली आहे.

आता त्याने श्रीलंकेविरुद्ध आणखीन एक विक्रम केला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध ४५ सामन्यात ५५ च्या सरासरीने २०७६ धावा केल्या आहेत. ज्यात त्याने ७ शतके लगावली आहेत. एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करणारा तो तिसरा फलंदाज बनला आहे. एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे, त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ९ शतके केली आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पण सचिनच आहे, त्यानेही श्रीलंके विरुद्ध ८ शतके केली आहेत.