धोनी-कोहलीचा हा मास्टरमाइंड प्लॅन वाचाच

बीसीसीआयने दोन दिवसांपूर्वीच खेळाडूंसाठीचा वार्षिक करार आणि खेळाडूंच्या श्रेणी घोषित केला आहे. या करारात पुरूष खेळाडूंच्या प्रकारात नविन श्रेणीचा समावेश करण्यात आला असुन त्याला A+ असे नाव देण्यात आले आहे. तसेच या श्रेणीत असणाऱ्या खेळाडूंना ७ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

त्यामुळे आता पुरूष खेळाडूंच्या प्रकारात A+ ,A ,B ,C अशा ४ श्रेणी झाल्या आहेत. हा करार आॅक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीसाठी असून सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीने याची घोषणा केली आहे.

जेव्हा हा करार घोषित करण्यात आला तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला तो माजी कर्णधार एमएस धोनीला A+ या श्रेणीतून वगळून त्याचा A श्रेणीत समावेश केला आहे याचा.

A+ या श्रेणीत फक्त ५ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात विराट कोहली, रोहीत शर्मा, शिखर धवन, जसप्रित बूमराह आणि भुवनेश्वर कूमार या खेळाडूंचा समावेश आहे.

पण आता असे समजले आहे की ही श्रेणी करण्यामागे धोनी आणि कोहलीची कल्पना होती. याबद्दल ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितले, ” या श्रेणीबद्दलची सूचना एका चर्चेत विराट आणि धोनी यांच्याकडून करण्यात आलेली आहे.”

ते पुढे म्हणाले, “या श्रेणीबद्दल त्यांचा तर्क असा होता की या श्रेणीमध्ये फक्त क्रिकेटच्या तीनही प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश असावा आणि ते खेळाडू क्रमवारीत पहिल्या १० मध्ये असायला हवे. त्यांना या श्रेणीमध्ये प्रतिभावान खेळाडू हवे होते. जिथे तुम्ही चांगली कामगिरी करा आणि त्याचे तुम्हाला बक्षीस मिळेल. त्यामुळे या श्रेणीत खेळाडूंना कायमचे स्थान नसेल. कारण तुमची कामगिरी खालावली की तुम्हाला या श्रेणीतून वगळले जाईल.”

तसेच त्यांनी असेही सांगितले की या करारासाठी खेळाडूंची निवड करण्याच्या निर्णयात सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली समिती आणि बीसीसीआय व्यवस्थापन समितीचा समावेश नाही. ही निवड एमएसके प्रसाद सरनदीप सिंग आणि देवंग गांधी यांचा समावेश असणाऱ्या समितीने केली आहे.

निवड समितीने या खेळाडूंची निवड करताना A श्रेणीत कसोटी खेळणारे आणि आयसीसी क्रमवारीत पहिल्या १५ मध्ये असणाऱ्या खेळाडूंचा समावेश केला आहे. तसेच B आणि C श्रेणीमध्ये वनडेमधील कामगिरी लक्षात घेऊन खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे.

याबरोबरच विनोद राय यांनी सांगितले आहे की भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे असे मत होते की फक्त कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनासुद्धा संपत्ती सुरक्षा मिळायला हवी.