विराट एक्सप्रेस काही थांबेना, विक्रमांचा नवा मुक्काम पहाच

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने जबरदस्त शतकी खेळी केली.

एका बाजूने नियमित अंतराने विकेट्स जात असतानाही आपल्याला जगातील मर्यादित षटकांतील सर्वोत्तम खेळाडू का म्हणतात हे आज विराटने दाखवून दिले. वनडे कारकिर्दीतील ३४वे शतक करताना विराटने अतिशय संयमी परंतु वेळ आली तेव्हा तेवढीच स्फोटक खेळी केली.

त्याने १५९ चेंडूचा सामना करताना १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद १६० धावांची खेळी केली.

नेहमीप्रमाणे या सामन्यातही विराटने अनेक विक्रम केले. ते विक्रम असे-

-विराट कोहलीने वनडेत ३४ शतके करण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षा १०१ डाव कमी खेळले आहेत.

-वनडे आणि कसोटीत भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक करण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर. विराटने कसोटीत १४ तर वनडेत १२ शतके कर्णधार म्हणून केली आहेत.

-वनडेत प्रत्येक ५.७९ डावांमागे विराटने शतक केले आहे. सर्वात कमी डाव प्रत्येक शतकामागे घेणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी. हाशिम अमलाने ६.०४ डावात ही कामगिरी केली आहे.

-आंतरराष्ट्रीय क्रिकतेमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट ५व्या स्थानावर. सचिन(१००), रिकी पॉन्टिंग(७१), कुमार संगकारा (६३), जॅक कॅलिस (६२) आणि विराट कोहली (५५) अशी ही क्रमवारी.

-शेवटच्या ६ वनडे डावात विराटने १२१, २९, ११३, ११२, नाबाद ४६ आणि नाबाद ११७ धावा केल्या आहेत.

-द्विपक्षीय वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेत कर्णधार म्हणून २ किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा विराट जगातील पहिला खेळाडू.

-भारतीय कर्णधार म्हणून वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट (१२) अव्वल स्थानी. सौरव गांगुलीचा ११ शतकांचा विक्रम मोडला. गांगुलीने वनडेत कर्णधार म्हणून १४२ डावात ११ शतके तर विराटने ४३ डावात १२ शतके केली आहेत.

-वनडेत कर्णधार म्हणून विराट कोहलीने १२वे शतक केले आहे. जागतिक क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रिकी पॉन्टिंगने २२० डावात २२ तर एबी डिव्हिलिअर्सने ९८ डावात १३ शतके केली आहेत.