१४० वर्षांच्या क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी करणारा विराट केवळ एकमेव खेळाडू !

कोलकाता । विराट कोहली हा जगातील एक परिपूर्ण फलंदाज आहे हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. विराटच्या आज केलेल्या ५०व्या आंतरराष्ट्रीय शतकामुळे तो पुन्हा एकदा संघासाठी किती महत्वाचा खेळाडू आहे हे अधोरेखित झाले.

२९वर्षीय विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ८वे स्थान मिळवले आहे.

त्याच्या पुढे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर(१००), रिकी पॉन्टिंग(७१), कुमार संगकारा(६३), जॅक कॅलिस(६२), हाशिम अमला(५४), महेला जयवर्धने(५४) आणि ब्रायन लारा(५३) हे खेळाडू आहेत.

परंतु याबरोबर विराटने पुन्हा एकदा खास विक्रम केला आहे तो म्हणजे ५०च्या सरासरीचा. विराटची क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सरासरी आहे ५०ची. 

वनडेत २०२ सामन्यात विराटची सरासरी आहे ५५.७४, टी२० त्याने आश्चर्यकारकपणे ५२.८६ची सरासरी राखली आहे तर काल पहिल्या कसोटीमध्ये शतकी खेळी केल्यामुळे विराटची सरासरी पुन्हा ५०च्या पुढे गेली आहे. त्याची कसोटीत सरासरी आता ५०.१२ झाली आहे. 

जगात कोणत्याही खेळाडूला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ५० किंवा त्यापेक्षा जास्त सरासरी एकाचवेळी राखता आलेली नाही.