विराट वनडे क्रमवारीत १० दिवसात पुन्हा अव्वल स्थानी तर बुमराह !

दुबई । आज आयसीसीने जागतिक वनडे क्रमवारी घोषित केली. या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने वनडेतील आपले अव्वल स्थान पुन्हा मिळवले आहे. दहा दिवसांपूर्वीच त्याने आपले अव्वल स्थान गमावले होते आणि दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने ते मिळवले होते परंतु काल न्यूझीलंड विरुद्ध केलेल्या शतकाच्या जोरावर विराटने पुन्हा एकदा एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे.

या फलंदाजीच्या यादीत भारतीय सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग पॉईंट मिळवले आहे. त्याचे आत्ताचे ७९९ इतके रेटिंग पॉईंट आहेत. परंतु तो सातव्या स्थानी कायम राहिला आहे. तर एमएस धोनी ११ व्या स्थानी आहे.

त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील गोलंदाजी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने तीन स्थानांची प्रगती केली आहे. बुमराहने या वर्षी भारताकडून ३५ बळींसह सर्वाधिक बळी घेतले आहेत.

या गोलंदाजीच्या यादीत पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली अव्वल स्थानी आला आहे तर दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहीर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच भारताचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल या यादीत आठव्या स्थानी आहे तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पंधराव्या स्थानी आहे.

अष्टपैलूंच्या यादीत मात्र एकही भारतीयाला पहिल्या १० मध्ये स्थान मिळवता आले नाही. या यादीत हार्दिक पंड्या सोळाव्या स्थानी आहे.

तसेच संघ क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर दक्षिण आफ्रिका अव्वल स्टॅन अबाधित राखून आहे.

१९९८मधील सचिनचा सार्वकालीन वनडे क्रमवारीचा विक्रम विराटने मोडला

आज आयसीसीने घोषित केलेल्या वनडे क्रमवारीत विराट कोहलीने एबी डिव्हिलिअर्सला मागे टाकत पुन्हा अव्वल क्रमांक पटकावला. त्याने ही कामगिरी करताना सचिनचाही विक्रम मोडला.

सध्या विराटच्या नावावर रेटिंगचे ८८९ पॉईंट्स आहेत तर एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर ८७२.

भारताकडून सार्वकालीन सर्वाधिक रेटिंग पॉईंट्स यापूर्वी सचिनच्या नावावर होते. त्याने १३ ऑक्टोबर ११९८ साली भारताकडून सार्वधिक आयसीसी वनडे रेटिंग पॉईंट्सचा हा विक्रम केला होता. जगातील सर्व खेळाडूंच्या सार्वकालीन यादीत सचिन १५व्या स्थानी आहे.

विराटने हा विक्रम मोडताना काल न्यूजीलँडविरुद्ध आयसीसी रेटिंग पॉईंट्स ८८९ केले. याबरोबर या यादीत तो १४व्या स्थानी आला आहे.

सध्या या यादीत विराटपुढे सध्या खेळत केवळ एबी डिव्हिलिअर्स आणि हाशिम आमला हे खेळाडू आहेत.

सार्वकालीन वनडेत क्रमवारीत भारतीयांचे रेटिंग पॉईंट्स 
८८९ विराट कोहली 
८८७ सचिन तेंडुलकर 
८८४ सौरव गांगुली 
८३६ एमएस धोनी 
८८१ मोहम्मद अझरुद्दीन