पृथ्वी शॉ आयसीसी क्रमवारीत दाखल तर कोहली अव्वल स्थानावर कायम

भारत विरुद्ध विंडिज यांच्यात 4-6 आॅक्टोबर आणि पाकिस्तान विरुद्ध आॅस्ट्रेलिया संघात 7-11 आॅक्टोबर दरम्यान पार पडलेल्या पहिल्य़ा कसोटी सामन्यानंतर आयसीसीने आज (12 आॅक्टोबर) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.

या क्रमवारीत भारताचा 18 वर्षीय युवा फलंदाज पृथ्वी शॉचाही समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली 936 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे.

पृथ्वीने विंडिज विरुद्ध राजकोट कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. त्याने पदार्पणाच्या सामन्यात शतक करताना 154 चेंडूत 134 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याला आयसीसी क्रमवारीत 73 वे स्थान दिले आहे.

त्याचबरोबर राजकोट कसोटीत भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने नाबाद शतक केले होते. त्यामुळे तो कसोटीत फलंदाजांच्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम 511 गुणांसह सहा स्थानांची प्रगती करत 51 व्या स्थानी आला आहे.

तसेच जडेजा हा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत बांगालदेशचा शाकिब अल हसन अव्वल स्थानावर आहे.

त्याचबरोबर गोलंदाजांच्या यादीत राजकोट कसोटीत दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेणारा कुलदीप यादवने 16 स्थानांची मोठी झेप घेताना 52 वे स्थान मिळवले आहे. तसेच गोलंदाजांच्या या क्रमवारीत जडेजा चौथ्या आणि आर अश्विन आठव्या स्थानी कायम आहे.

फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तान विरुद्ध पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक करणारा आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजाने पहिल्या दहा जणांमध्ये स्थान मिळवले आहे. तो 10 व्या क्रमांकावर आला आहे.

तसेच फलंदाजांच्या या क्रमारीत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन 49 व्या स्थानी विराजमान झाला आहे. तर आॅस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण करणारा अॅरॉन फिंच 72 व्या आणि ट्रेविस हेड 103 व्या स्थानावर आले आहेत.

त्याचबरोबर पाकिस्तानचा मोहम्मद हाफिज 45 व्या, असद साफिक 20 व्या आणि हॅरिस सोहेल 57 व्या स्थानावर आले आहेत.

आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीत 7 विकेट घेणारा पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद अब्बास विंडिजचा कर्णधार जेसन होल्डरसह 13 व्या स्थानावर आला आहे. तसेच आॅस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या डावात 6 विकेट घेणारा बिलाल असीफने 69 व्या क्रमांक पटकावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच शार्दुल ठाकुरला बसला मोठा धक्का

आर अश्विनने केला मोठा पराक्रम; अनिल कुंबळेलाही टाकले मागे

फलंदाजांसाठी गोलंदाज अनिल कुंबळेने केली जगातील सर्वात भारी गोष्ट