धोनीची कामगिरी उत्तम होण्यापाठीमागे विराटचा पाठिंबा मोठा : सौरव गांगुली

कोलकाता । भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मते माजी कर्णधार एमएस धोनीची सध्या होत असलेली उत्तम कामगिरी धोनीचा वारसदार कर्णधार विराट कोहलीमुळे होत आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये गांगुली म्हणतो, ” जेव्हा खेळाडू खूप काळ क्रिकेट खेळतात तेव्हा त्यांना कश्या धावा जमवायच्या हे माहित असते. धोनीने तब्बल ३०० सामने खेळले आहेत. त्याने ९००० धावा केल्या आहेत आणि निवृत्तीच्या वेळी त्याच्या नावावर यापेक्षा जास्त धावा असतील. ”

“कर्णधार विराट कोहलीने दाखवलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे. त्याला याचे श्रेय द्यायला हवे. कारण त्याने धोनीवर मोठा विश्वास दाखवला. त्यानेच धोनीला जसे हवे आहे तसे खेळू दिले.”

“खेळाडू हे कर्णधाराने दाखवलेल्या विश्वासामुळे बनतात आणि कर्णधाराने जर विश्वास नाही दाखवला तर ते कोलमडतात. म्हणूनच विराट कोहलीला याच श्रेय द्यायलाच लागेल की त्याने धोनीवर विश्वास टाकला. ”

धोनीने २०१७ वर्षात ६२७ धावा करताना १९ सामन्यात ८९.५७ची उत्तम सरासरी राखली आहे. चेन्नई सामन्यात धोनी त्याचा ३०२वा वनडे सामना खेळला.