या खास व्यक्तीमुळे बदलले विराट कोहलीचे आयुष्य…

मोहाली। शनिवारी(13 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला. हा त्यांचा या मोसमातील पहिला विजय ठरला आहे. या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांनी अर्धशतके करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यानंतर डिविलियर्स बरोबर बोलताना विराटने त्याची पत्नी अनुष्का शर्माचे कौतुक केले आहे. तसेच तिच्याबरोबर लग्न करणे ही त्याच्या आयुष्यातील सर्वात उत्तम गोष्ट असल्याचे म्हटले आहे. विराट आणि अनुष्का यांचा विवाह डिसेंबर 2017 मध्ये झाला आहे.

याबद्दल बोलताना विराट म्हणाला,  ‘आता लग्नाला एकवर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. माझ्यासाठी लग्न करणे ही सर्वात चांगली गोष्ट झाली आहे. त्यामुळे माझे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. माझ्याकडे सर्वात सुंदर पत्नी आहे, सर्वात सुंदर व्यक्ती आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात भक्कम व्यक्ती आहे.’

‘मी आधी खूप आक्रमक होतो. पण ती मला कायम प्रोत्साहन देत असते. आम्ही खेळापासून दूर एकत्र चांगला वेळ घालवला आहे. मला वाटते की मी भाग्यशाली आहे, माझ्याकडे अशी व्यक्ती आहे जी माझी मानसिकता समजते. त्यामुळे मी तिच्याबरोबर वेळ घालवेल ज्यामुळे मी खेळाच्या विचारांपासून दुर राहिल.’

याबरोबर विराट डिविलियर्सबद्दल म्हणाला,  ‘आम्ही एकत्र अनेक भागीदाऱ्या केल्या आहेत. कारण आम्ही सारखा खेळ करतो आणि एकमेकांना चांगले समजतो. आम्ही एकेरी दुहेरी धावाही जलद घेतो. तूझ्याबरोबर फलंदाजी करणे नेहमीच खास असते. काहीही न बोलताही खेळाबद्दल जाणतो, त्यामुळे एकमेकांबरोबर आम्ही चांगली फलंदाजी करतो.’

यानंतर शेवटी डिविलियर्स गमतीने म्हणाला, ‘स्थिरता, समतोल आणि चांगली पत्नी हे चांगल्या आयुष्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत.’ यावर विराटनेही सहमती दर्शवली. हा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर करण्यात आला आहे.

शनिवारी झालेल्या या सामन्यात पंजाबने दिलेल्या 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून विराटने 67 धावांची तर एबी डिविलियर्सने नाबाद 59 धावांची खेळी करत बेंगलोरच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

महत्त्वाच्या बातम्या –

कोहलीने रैनाला टाकले मागे, डिविलियर्सच्या साथीनेही केला खास विक्रम

पहिल्या विजयानंतरही कर्णधार कोहलीला झाला लाखोंचा दंड, जाणून घ्या कारण