विराटच्या मते भारतीय संघातील हा खेळाडू खेळतो सर्वात भारी फुटबॉल

भारतीय संघातील खेळाडूंची रविवारी, १५ ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या ‘सेलिब्रिटी क्लासिको’ फुटबॉल सामन्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध चालू असलेल्या टी २० मालिकेतील शेवटचा सामना खेळून भारतीय संघातील खेळाडू फुटबॉल सामन्यासाठी मुंबईला जातील.

या सामन्यानिमित्त स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर झालेल्या एका मुलाखतीत विराट बोलत होता. या मुलाखतीचं सूत्रसंचालन जतीन सप्रू करत होता. जेव्हा जतीनने विराट प्रश्न विचारला की संघातील चांगला गोलकिपर कोण आहे त्यावर विराट म्हणाला की, “मोहम्मद शमी गोलकिपर म्हणून चांगला आहे मागच्या वर्षी त्याने तो चांगला खेळ केला होता.”

विराटला जेव्हा विचारलं की संघातील चांगला फुटबॉल खेळाडू कोण आहे त्यावर विराट म्हणाला की “कोणीतरी मला विचारलं होत की माझी फिफा क्रमवारी काय असेल तर, मी म्हणालो होतो की ९८ असेल. त्यापेक्षा बिलकुल कमी नसेल. मी शूटिंगमध्ये चांगला आहे माझा उजवा आणि डावा पाय चांगले आहेत. एक फुटबॉलपटू म्हणून मला वाटत मी पूर्णपणे फुटबॉल खेळाडू आहे. माझ्या डोक्यात माझ्यासाठी मी रोनाल्डो आहे.”

त्याच बरोबर विराट म्हणाला “मनीष पांडे हा संघातील चांगला खेळाडू आहे.तसेच मला असे वाटते की छोट्या धावा करून आणि जो गोल करू शकेल त्याला बॉल पास करणे हे माझ्या खेळातील चांगली गोष्ट आहे. एम. एस. धोनी हा राईट विंगर असेल कारण तो चपळ आहे किंवा तो सेंटर फॉरवर्डला असेल. तो ज्या ठिकाणी आहे ती त्याच्यासाठी चांगली असेल कारण तो पास कसा कुठे द्यायचा हे उत्तम जाणतो. मनीष पांडे हा मिडफिल्ड या जागेवर खेळेल.”

विराट सामन्यातील चुरस दाखवण्यासाठी असेही म्हणाला की फॅशनपेक्षा खेळात क्षमतेला जास्त महत्व असते.

हा फुटबॉल सामना भारतीय संघातील क्रिकेटपटू विरुद्ध बॉलीवूड कलाकार अशी रंगेल. त्यात विराट हा भारतीय संघातील खेळाडू असलेल्या ऑल हार्ट्स एफसी संघाचं तर रणबीर कपूर बॉलीवूड कलाकार असलेल्या ऑल स्टार्स एफसी संघाचं नेतृत्व करेल.