कोहलीने सांगितले जडेजा अश्विनला संघाबाहेर ठेवायचे कारण !

मुंबई । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. गोलंदाजांना अति श्रमापासून दूर ठेवणे आणि विश्वचषकासाठी बऱ्यापैकी पर्याय उपलब्ध असण्यासाठी त्यांना विश्रांती देण्यात आल्याचे कोहलीचे म्हणणे आहे.

” आम्हाला २०१९ विश्वचषकापूर्वी सर्वोत्तम गोलंदाजी समीकरण शोधणे गरजेचे आहे. आम्हाला रिस्ट स्पिनर संघात असावा असे वाटत होते. आम्हाला दोन रिस्ट स्पिनर एकाच वेळी संघातून खेळावे असे कधीही वाटले नाही. परंतु ते चांगली कामगिरी करत आहेत.

“अश्विन आणि जडेजा गेली ६-७ वर्ष खेळत आहेत. त्यांच्यावरही अतिरिक्त भार पडत होता. आम्ही असेही काही गोलंदाज पाहत आहोत जे सर्व प्रकारात खेळू शकतात. “

” जरी सध्या संघाबद्दल कोणतीही चर्चा सुरु असली तरी संघाची गतिशीलता आता वाढलेली आहे ही गोष्टही तेवढीच खरी आहे. “

राहणेबद्दल बोलताना कोहली म्हणाला, ” त्याने तिसरा सलामीवीर म्हणून संधीचे सोने केले आहे. तो धैर्याने उभा राहिला आणि संधी निर्माण केल्या. आम्ही केवळ दोन सलामीवीर खेळवू शकतो आणि राहणे तेवढा समजदार आहे. “

भारत विरुद्ध न्यूजीलँड मालिकेतील पहिला वनडे सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर उद्यापासून होणार आहे.