कोहलीने मोडला सनथ जयसूर्याचा विक्रम

कोलंबो, श्रीलंका । येथे चालू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत या चौथ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने दणदणीत शतक करून आणखीन एक विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

विराटने आपल्या १९३ सामन्यांच्या एकदिवसीय कारकिर्दीत ५५.०५ च्या सरासरीने ८४२३ धावा केल्या आहेत. त्यात त्याने ४४ अर्धशतके आणि २९ शतके केली आहेत.

सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता त्याच्यावर फक्त ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग (३०) आणि भारताचा सचिन तेंडुलकर (४९) आहे. त्याने आज शतकी खेळी करून श्रीलंकेच्या धडाकेबाज सलामीवीर फलंदाज सनत जयसूर्याला मागे टाकले, जयसूर्याने एकदिवसीय कारकिर्दीत २८ शतके आहेत.

या यादीतील पहिल्या तीनही फलंदाजांनी ३५० हुन अधिक सामने खेळले आहेत तर विराटने फक्त १९३ सामने खेळले आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली आता ९व्या स्थानी आहे. त्याने तिन्ही प्रकारात मिळून ४६ शतके केली आहेत.