पहिली वनडे: कर्णधार विराटचे दमदार शतक

डर्बन| दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात पहिला वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने दमदार शतक झळकावले आहे.

त्याचे हे ३३ वे वनडे शतक असून सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील दुसरे शतक आहे. त्याने आज १०५ चेंडूत नाबाद शतक झळकावले. या शतकी खेळीत त्याने ९ चौकार मारले. तो अजूनही नाबाद खेळत आहे.

ही खेळी करतानाच वनडेत भारतीय कर्णधार म्हणून त्याने सर्वाधिक शतके करण्याच्या सौरव गांगुलीच्या ११ शतकांची बरोबरी केली आहे. त्याचबरोबर तो ९ देशात वनडे सामने खेळला आहे आणि या नऊही देशात त्याने शतके झळकावण्याचाही विक्रम केला आहे.

त्याला अजिंक्य रहाणेने चांगली साथ दिली. राहणेचेही अर्धशतक झाले आहे. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १५० पेक्षाही जास्त धावांची नाबाद भागीदारी रचली आहे.