म्हणून विराट कोहलीने केले अभिनव मुकुंदचे कौतुक !

आज अभिनव मुकुंदने ट्विटरच्या माध्यमातून वर्णद्वेषाबद्दल ५ ते ६ ट्विट करून भावांना वाट मोकळी करून दिली. त्यात अभिनव मुकुंदने जीवनात जे काही सहन केले त्याबद्दल तसेच सावळ्या रंगांच्या व्यक्तींबद्दल भाष्य केले आहे.

त्याच्या या वक्तव्यानंतर भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी त्याला पाठिंबा दिला. आर अश्विन, हार्दिक पंड्या, शिखर धवन आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांनी याबद्दल त्याला पाठिंबा दिला आहे.

विराटने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की मस्त बोललास अभिनव !


काय आहे हे संपूर्ण प्रकरण !

वर्णभेद ही मानवजातीच्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक आहे आणि बऱ्याचजणांना असे वाटते की खेळात ही संकल्पना प्रवेश करू शकत नाही. पण खरे पाहता इतिहासात बऱ्याच वेळा अनेक खेळाडू वर्णभेदाचे बळी पडले आहेत.

भारताचा सलामीवीर अभिनव मुकुंदही आता या वर्णभेदाचा शिकार बनला आहे. त्याने आता ट्विटरवर एक भावनिक संदेश पोस्ट केला आहे. तो म्हणाला, ” केवळ गोरा असणे म्हणजेच सुंदर नाही आणि या बाबतीत लोकांचे विचार बदलले पाहिजेत. ”

त्यानंतर त्याने एक संदेश लिहिला आहे, ज्यात त्याने म्हटलं आहे, “मी वयाच्या १० व्या वर्षापासून क्रिकेट खेळत आहे आणि हळूहळू मी ही यशाची शिडी चढत आहे. सर्वोच्च पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा एक माझ्यासाठी सन्मान आहे. मी हे सहानुभूती प्राप्त करण्यासाठी नाही तर लोकांचं या विषयावर लक्ष वेधण्यासाठी लिहीत आहे.”

“मी १५ वर्षांचा असल्यापासून देशात आणि देशाबाहेर खूप प्रवास केला आहे. मी लहान होतो तेव्हापासून माझ्या रंगाचा फरक लोकांना पडतो हे मी बघितले होते. जो कोणी क्रिकेट खेळतो त्याला हे लगेच समजेल. मी सूर्यप्रकाशात दिवस दिवस क्रिकेटचे प्रशिक्षण घायचो आणि मला काडी मात्र फरक पडत नाही की माझा रंग काळा होतोय किंवा नाही. माझे या खेळावर प्रेम आहे आणि मी जे करतोय त्याच्यावर मी प्रेम करतो. मी जे आज यश मिळवलं आहे ते जो मी उन्हात घाम गाळला त्याचंच फळ आहे. मी मूळचा चेन्नईचा आहे. आपल्या देशातील कदाचित सर्वात उच्च तापमान असलेल्या शहरांपैकी एक आणि मी आनंदाने माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त वेळ क्रिकेट खेळत ग्राऊंडवर घालवलेला आहे “.

यामुळे सोशल मीडियावर खूपच गोंधळ उडाला. लोकांना वाटू लागले की अभिनवला भारतीय संघात वर्णभेद सहन करावा लागला आहे. त्यामुळेच त्याने ही पोस्ट केली आहे. पण त्यानंतर मुकुंदने हा गोंधळ मिटवण्यासाठी आणखीन एक ट्विट टाकला ज्यात त्याने म्हटले आहे की त्याचा हा ट्विट भारतीय संघासाठी नाही तर त्याने आज जे समाजात पहिले त्यासाठी होता.

श्रीलंकेत सुरु असलेल्या कसोटी संघात अभिनव मुकुंदचा समावेश आहे.

तिसरा सलामीवीर म्हणून संघात समाविष्ट झाल्यानंतर मुकुंदने पहिल्या कसोटीत ८१ धावा केल्या होत्या. दुसऱ्या कसोटीत त्याच्या जागी के एल राहुलला संधी देण्यात आली होती.