विराट कोहलीची राजीव गांधी खेलरत्नसाठी शिफारस, बनणार केवळ तिसरा क्रिकेटर

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मिराबाई चानूची संयुक्तरित्या देशातील सर्वोच्च क्रिडा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’साठी शिफारस करण्यात करण्यात आली आहे.

या पुरस्कार निवड समितीच्या एका सुत्राने सांगितले की 2016ला सुद्धा कोहलीची शिफारस करण्यात आली होती. पण त्यावेळी कोहलीच्या नावावर पुरस्कार निवड समितीने सहमती दाखवली नव्हती.

विराट हा सध्या आयसीसीच्या कसोटी आणि वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. तसेच त्याची कामगिरीही मागील काही दिवसांपासून चांगली झाली आहे.

जर केंद्रीय क्रिडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी विराटच्या नावाला मंजूरी दिली तर तो खेलरत्न पुरस्कार मिळवणारा तिसराच क्रिकेटपटू ठरणार आहे. याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीला खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका सुत्राने पीटीआयला सांगितले की “विराट कोहली आणि मिराबाई चानू यांच्या नावाची शिफारस पुरस्कार समीतीने केली आहे.”

कोहलीला 2016 आणि 2017 अशी दोन्ही वर्षी या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. पण 2016 ला साक्षी मलिक, पीव्ही सिंधू आणि दीपा कर्मारकरला त्यांनी रिओ आॅलिम्पिकमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता.

तर 2017 ला भारताचा माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग आणि पॅरा अॅथलिट देवेंद्र झांजारियाला खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

याबरोबरच या पुरस्कारासाठी बॅडमिंटनपटू श्रीकांत किदांबीच्याही नावाचा विचार झाला होता. त्याने मागील वर्षी चांगली कामगिरी बजावताना चार सुपर सिरीजची विजेतीपदके पटकावली होती. पण त्याचे नाव या पुरस्कारासाठी मिराबाई चानूच्या मागे पडले.

अशी आहे मिराबाई चानूची कामगिरी-

तीने मागील वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या 48 किलो वजनीगटात विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. तसेच ती यावर्षी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक विजेती होती.

तिच्याकडून भारताला 2020 ला होणाऱ्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये एकमेव पदकाची अपेक्षा आहे.  सध्या ती पाठिच्या दुखापतीतून सावरत आहे. या दुखापतीमुळे तीला इंडोनेशियाला झालेल्या एशियन गेम्समध्येही सहभागी होता आले नव्हते.

अशी आहे कोहलीची कामगिरी-

कोहलीने आत्तापर्यंत कसोटीत 71 सामन्यात 6147 धावा, वनडेत 211 सामन्यात 9779 धावा आणि 62 टी20 सामन्यात 2102 धावा केल्या आहेत. तसेच त्याने कसोटीत 23 शतके  आणि वनडेत 35 शतके असे मिळून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 58 शतके केली आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्यात तो सचिन तेंडुलकर नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

याबरोबरच खेलरत्न पुरस्कार मिळण्याआधी पद्मश्री पुरस्कार मिळवणारा कोहली हा दुर्मिळ खेळाडूंपैकी एक आहे.

त्याने कर्णधार म्हणून भारत दौऱ्यावर आलेल्या आॅस्ट्रेलिया, इंग्लंड या संघाना पराभूत केले आहे. तसेच विंडिज आणि श्रीलंकेच्या दौराही यशस्वी केला आहे. त्याचबरोबर त्याने वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मर्यादीत षटकांच्या मालिकांमध्ये विजय मिळवला होता.

कोहली हा 2011 विश्वचषक आणि 2013 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. त्याला आयसीसीने 2012 आणि 2017 ला वनडेतील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कारही दिला होता.

तसेच 2017 ला तो आयसीसीच्या क्रिकेटर आॅफ द इयर ( वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू) पुरस्काराचा मानकरीही ठरला होता. त्याचबरोबर बीसीसीआयचा त्याला पाच वेळा क्रिकेटर आॅफ द इयर पुरस्कार मिळाला आहे.

तो नुकताच इंग्लंड दौऱ्यावरुन परतला असून त्याने या दौऱ्यात 894 धावा केल्या आहेत. पण त्याच्या या कामगिरीचा या पुरस्काराच्या शिफारसीसाठी विचार करण्यात आलेला नाही.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एम एस धोनीने शास्त्रींच्या अनुपस्थितीत खेळाडूंना दिला कानमंत्र

मितालीच्या विक्रमांच्या यादीत आणखी एक मनाचा तुरा

-पाकिस्तानचे हे पाच खेळाडू ठरु शकतात भारताला डोकेदुखी