आयसीसीच्या २०१७ पुरस्कारांमध्ये विराटचा बोलबाला

भारताचा कर्णधार विराट कोहली २०१७ चा आयसीसीचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि २०१७ चा सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटू ठरला आहे. यासाठी त्याला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीने गौरविण्यात आले.

विराटसाठी २०१७ हे वर्ष उत्तम गेले होते. तो २०१७ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला होता. या आयसीसीच्या पुरस्कारांसाठी २१ सप्टेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीतील कामगिरी लक्षात घेतली होती.

या कालावधीत विराट कोहलीने कसोटीमध्ये ७७.८० च्या सरासरीने ८ शतकांच्या साहाय्याने २२०३ धावा केल्या आहेत. तसेच वनडेमध्ये ७ शतकांसह ८२.६३ च्या सरासरीने १८१८ धावा केल्या आहेत, तर टी २० मध्ये १५३ च्या स्ट्राईक रेटने २९९ धावा केल्या आहेत.

कोहली या वर्षी दुसऱ्यांदा वनडेतील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू बनला आहे. या आधी त्याने २०१२ला हा पुरस्कार मिळवला होता. तसेच मागच्या वर्षी आयसीसीचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून आर अश्विनला गौरविण्यात आले होते. यावर्षी हा पुरस्कार विराटने मिळवत भारतातच हा पुरस्कार ठेवला आहे.

या पुरस्काराबद्दल विराट म्हणाला, “माझ्यासाठी आयसीसीचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि वनडेचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू या पुरस्कारासाठी सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी विजेता होते खूप महत्वाचे आहे.”