कोहली कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठ्या विक्रमासाठी एका विजयापासून दूर !

दिल्ली । भारत हा कसोटी क्रिकेटमध्ये सलग ९ कसोटी मालिका विजयापासून केवळ एका विजयाने दूर आहे. जर भारतीय संघ दिल्ली कसोटीत श्रीलंका संघाविरुद्ध कसोटी सामना जिंकला अथवा अनिर्णित राखू शकला तर कसोटी क्रिकेटमध्ये सलग ९ मालिका जिंकणारी टीम इंडिया केवळ दुसरा संघ बनेल.

भारतीय संघ मालिकेत १-० असा आघाडीवर आहे. दिल्ली कसोटीत भारतीय संघाने जर विजय मिळवला तर होम सिझनमध्ये भारतीय संघाने पूर्णपणे कसोटीत बाकी संघांना पराभूत करून मोसमावर आपले नाव कोरले असा त्याचा अर्थ होईल.

२००५ ते २००८ या काळात ऑस्ट्रेलिया संघ सलग ९ कसोटी मालिकेत विजयी झाला होता. २०१५मध्ये जेव्हा श्रीलंका संघाने भारताचा दौरा केला होता तेव्हापासून भारतीय संघ कसोटी मालिकेत अपराजित आहे.

भारत या काळात बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंका देशांविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळला आहे. भारतीय संघ या काळात २९ कसोटी सामने खेळला असून त्यात २१ विजय २ पराभव आणि ६ सामने अनिर्णित अशी संघाची कामगिरी राहिली आहे.