सर्वच ऑस्ट्रेलियन माझे दुश्मन नाहीत..!!

विराट कसोटी मालिका संपून आता दोन दिवस झाले तरी यातील वाद काही संपायचं नाव घेत नाही. चौथ्या कसोटीमध्ये पत्रकार परिषदेत जेव्हा विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन खेळाडूंबरोबर असलेले मित्रत्वाचे नाते संपुष्टात आल्याचं वक्तव्य केलं तेव्हा ऑस्ट्रेलियन माध्यमांकडून त्याच्यावर टीकेची झोड उठली.

त्याबद्दल आज विराटने रीतसर ट्विट्स करून त्याची बाजू मांडली. पत्रकार परिषदेतील आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असे सांगताना विराटने पुढे असाही म्हटले आहे की मी सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंबाबत तसे बोललो नव्हतो. मी काही ठराविक खेळाडूंबद्दल माझे मत व्यक्त केले होते. आयपीएलमध्ये मी ज्या खेळाडूंबरोबर खेळतो, ज्या खेळाडूंना मी ओळखतो, त्यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत आणि भविष्यातही राहतील. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंबरोबरील संबंधांतही तसूभरही बदल होणार नाही. चौथ्या कसोटीनांतर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथने मालिकादरम्यान जे काही झाले त्याबद्दल माफी मागितली होती आणि भारतीय कर्णधार रहाणेने बियर पार्टीला बोलवण्याचा आग्रहही केला होता.