२०१९च्या आयपीएल आधी विरेंद्र सेहवागने घेतला मोठा निर्णय; ट्विटरवरुन दिली माहिती

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने 2019 च्या आयपीएलमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा भाग नसेल, याची ट्विटरवरुन माहिती दिली आहे.

सेहवागला 2016 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्याआधी तो पंजाबकडून दोन वर्षे आयपीएलमध्ये खेळला होता. पण आता त्याने पंजाब संघाबरोबर असलेल्या पाच वर्षांच्या संबंधांना पूर्णविराम दिला आहे.

याबद्दल सेहवागने ट्विट केले आहे की ‘सर्वच चांगल्या गोष्टींना शेवट असतो. मी किंग्ज इलेव्हन पंजाब बरोबर 2 वर्ष खेळाडू म्हणून आणि 3 वर्ष मार्गदर्शक म्हणून चांगला वेळ घालवला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबरील माझ्या नात्याचा शेवट झाला आहे. मी त्यांच्याबरोबर घालवलेल्या वेळेबद्दल आभारी आहे. मी संघाला शुभेच्छा देतो.’

त्याने हा निर्णय कोणत्या कारणामुळे घेतला हे मात्र अजून अस्पष्ट आहे. पण मागील वर्षापासून त्याचे किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालकीन प्रीती झिंटाबरोबर मतभेद झाल्याचे वृत्त होते. त्यामुळे सेहवागच्या या निर्णयामागे हे कारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सेहवाग आणि प्रीती झिंटामध्ये काही रिपोर्ट्स नुसार, पंजाबचा संघ राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाल्यानंतर वाद झाले होते. पण या वृत्ताचे प्रीती झिंटाने खंडन केले होते. तसेच हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले होते.

त्याचबरोबर किंग्ज इलेव्हन पंजाबने काही दिवसांपूर्वीच आॅस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॉजच्या ऐवजी न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने मागील वर्षी आर अश्विनच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये चांगली सुरुवात केली होती. परंतू त्यांना सातत्य राखण्यात अपयश आले होते. त्यामुळे त्यांना गुणतालिकेत 7 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

ISL 2018: फॉर्मामध्ये असलेल्या जमशेदपूर संघाचे दिल्लीला आव्हान

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १३- तामिळनाडूचा वन मॅच वंडर

स्टार क्रिकेटर अंबाती रायडूने घोषित केली निवृत्ती