ट्विटर पोस्टमुळे सेहवाग पुन्हा एकदा चर्चेत

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी तर प्रसिद्ध आहेच, पण सात्यत्याने नव नवीन आणि विनोदी ट्विट्समुळे देखील तो चाहत्यांमध्ये तितकाच प्रसिद्ध आहे.

आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सेहवाग अनेक उपक्रमांमधून लोकांपुढे आला आहे. तो सध्या स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना देखील आपल्याला बऱ्याचदा दिसतो.

नुकताच सेहवागने आपल्या ट्विटर अकाउंटवर खास ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्याने प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘गुंडा’ या सिनेमातील एक डायलॉग ट्विट केला. त्याच बरोबर त्याने आपल्या चाहत्यांना देखील या चित्रपटातला आपला आवडता डायलॉग ट्विट करण्यास सांगितला.

चाहत्यांनी देखील सेहवागला नाराज न करता प्रचंड ट्विट्स केले आणि त्याला सेहवागने उत्तर देखील दिले. पण एकंदरीत यामुळे सेहवाग पुन्हा एकदा जोरदार चर्चेत मात्र नक्की आला.

यापूर्वी देखील सेहवागने ट्विटरवर अनेकांची खिल्ली उडवली आहे. आपल्या संघमित्रांना तो त्याच्या शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. नुकताच न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरला देखील त्याने असेच गमतीशीर ट्विट केले होते ज्यावर टेलरने त्याला हिंदीत प्रतिउत्तर दिले.

सेहवाग आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असला तरी सातत्याने प्रकाशझोतात कसे राहायचे हे त्याला चांगले ठाऊक आहे.