आईस क्रिकेटमध्येही विरेंद्र सेहवागचा धमाका

भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने आईस क्रिकेट खेळताना दमदार अर्धशतक झळकावले आहे. त्याने हे अर्धशतकही त्याच्या हटके शैलीत म्हणजेच चौकार ठोकत पूर्ण केले.

आज सेहवागचा डायमंड्स XI आणि आफ्रिदीच्या रॉयल्स XI संघात स्विझर्लंडमध्ये आईस क्रिकेटचा सामना सुरु आहे. या सामन्यात सेहवाग नेतृत्व करत आसलेल्या डायमंड्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १६४ धावा केल्या आहेत.

त्यांच्याकडून वीरेंद्र सेहवागने सलामीला येऊन ३१ चेंडूत आक्रमक ६२ धावा केल्या आहेत. यात त्याने ४ चौकार आणि ५ षटकार ठोकले. सेहवागला पाकिस्तानचा महान गोलंदाज शोएब अख्तरने बाद केले. सेहवागबरोबरच अँड्र्यू सायमंड्सने ३० चेंडूत ४० धावा केल्या आहेत. या दोंघांच्या खेळीच्या जोरावर डायमंड्स संघाने रॉयल्स संघाला १६५ धावांचे आव्हान दिले आहे.

बाकी फलंदाजांपैकी डायमंड्स संघाकडून तिलकरत्ने दिलशान(८) ,महेला जयवर्धने(७), माईक हसी(१), मोहम्मद कैफ(१९), जोगिंदर शर्मा(१८), रमेश पोवार(२), अजित आगरकर(१), झहीर खान(२*) आणि लसिथ मलिंगा(१*) यांनी धावा केल्या.

रॉयल्स संघाकडून अब्दुल रझाक(४/१८), शोएब अख्तर(२/३२), शाहिद आफ्रिदी(१/२१) आणि नॅथन मॅक्युलम(१/२८) यांनी बळी घेतले आहे.

ही आईस क्रिकेट स्पर्धा आज आणि उद्या खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत विविध देशांच्या महान क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला आहे. यात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड,दक्षिण आफ्रिका या देशांच्या खेळाडूंचा सहभाग आहे.

तसेच जॅक कॅलिस, डॅनियल व्हिटोरी, झहीर खान, लसिथ मलिंगा असे मोठे खेळाडूंनीही यात सहभाग घेतला आहे.