१००व्या वनडे सामन्यात वॉर्नरचे खणखणीत शतक

बेंगलोर । येथील चिन्नस्वामी मैदानावर चालू असेलल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरने खणखणीत शतक केले. भारतीय गोलंदाजांना २५ षटकांनंतरही ऑस्ट्रेलियाच्या एकही फलंदाजला तंबूत पाठवता आलेले नाही.

डेव्हिड वॉर्नर आज वनडे कारकिर्दीतील १००वा वनडे सामना खेळत आहे. वॉर्नरचे हे आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधले १४वे शतक आहे, त्याच बरोबर त्याने १७ अर्धशतके ही केली आहेत. ऑस्ट्रेलियाकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये १६व्या क्रमांकावर आहे. या ऑस्ट्रलियाच्या संघात वॉर्नरकडे सर्वाधिक वनडे धावा आहेत.

वॉर्नर पदार्पणापासून ते २०१४ पर्यंत ५० वनडे सामने खेळला. त्यात त्याने ३१.४१च्या सरासरीने १५३९ धावा केल्या. तर २०१५ ते आजपर्यंत ४९ वनडेत त्याने तब्बल ५८.०५च्या सरासरीने २६५४ धावा केल्या आहेत. पहिल्या ९९ वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वॉर्नर ३ऱ्या क्रमांकावर असून भारतीय कर्णधार विराट कोहलीपेक्षाही त्याने ८ धावा जास्त केल्या आहेत.

याबरोबर वॉर्नरने १०० सामन्यांत त्याने ४५च्या सरासरीने ४१९३ धावा केल्या आहेत. पहिल्या १०० सामन्यात सर्वाधिक धावा करणारा वॉर्नर हा दुसरा खेळाडू बनला आहे. आफ्रिकेच्या हाशिम अमलाने १०० सामन्यात ४८०८ धावा केल्या आहेत.